‘डेनिसोवन’ मानव एकेकाळी होते संपूर्ण आशियात

Denisovan human
‘डेनिसोवन’ मानव एकेकाळी होते संपूर्ण आशियात
Published on
Updated on

कोपेनहेगन ः आधुनिक मानव हा होमो सेपियन्सपासून विकसित झाला असे मानले जाते. मात्र, कालौघात ही एकमेव मनुष्य प्रजाती होती, असे नाही. निएंडरथल, होमो फ्लोरेसिएन्सिस, डेनिसोवनसारख्या अन्यही काही मनुष्य प्रजाती होत्या, ज्या कालौघात नामशेष झाल्या. तैवानच्या किनार्‍याजवळ सापडलेला एक गूढ मानवी जबड्याचा अवशेष निःसंशयपणे आपल्यासारख्या होमो सेपियन्स किंवा निएंडरथल यांचा नव्हे, तर डेनिसोवन नावाच्या मानवाच्या विलुप्त नातलग प्रजातीचा आहे, असे एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून समोर आले आहे. यावरून ही प्रजाती संपूर्ण आशियात फैलावली होती, असे दिसून येते.

या जबड्याचा भाग 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस तैवानच्या पश्चिम किनार्‍याजवळील पेंग्हू चॅनलमध्ये एका मासेमार्‍याला सापडला होता. मात्र, तो कोणत्या मानव प्रजातीचा आहे, हे अनेक वर्षे एक कोडेच राहिले होते. आता, संशोधकांनी प्रथिनांचे विश्लेषण करणार्‍या अत्याधुनिक पॅलिओप्रोटीओमिक्स तंत्राचा वापर करून हा अवशेष डेनिसोवन मानवाचा असल्याचे सिद्ध केले आहे. कोपेनहेगन विद्यापीठातील अणु-अंतर्गत मानववंशशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक फ्रिडो वेल्कर यांनी सांगितले, हेच तंत्र वापरून इतरही मानवी अवशेषांचे विश्लेषण केले जात आहे, ज्यातून ते डेनिसोवन, निएंडरथल किंवा अन्य प्राचीन मानव प्रजातींचे होते का, हे स्पष्ट करता येईल. ‘पेंग्हू 1’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जबड्याचा भाग अतिशय मजबूत असून, त्यात मोठे दात आहेत. त्यामुळे तो होमो सेपियन्सचे पूर्वसुरी असलेल्या होमो इरेक्टस् (पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारा मनुष्य), अर्काईक होमो सेपियन्स की, डेनिसोवन या तिघांपैकी कुणाचा असावा, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद होते. डेनिसोवन हे मानवाचे विलुप्त नातेवाईक असून, ते प्लायस्टोसीन युगात आशियामध्ये वास्तव्य करत होते. त्यांच्या हाडांचे नमुने फार थोडे सापडले आहेत, विशेषतः सैबेरियातील डेनिसोवा गुहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे आणि त्यांच्या जीवनशैलीचा मागोवा घेणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र, प्राचीन प्रथिनांचे विश्लेषण करून, या अभ्यासात ‘पेंग्हू 1’ हा एक पुरुष असून, त्याच्या प्रथिन रचनेत डेनिसोवनसारखी वैशिष्ट्ये आढळली आहेत. हे संशोधन ‘सायन्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news