Japan Accident Houses | जपानमध्ये दुर्घटना घडलेल्या घरांची वाढली मागणी!

Japan Accident Houses |
Japan Accident Houses | जपानमध्ये दुर्घटना घडलेल्या घरांची वाढली मागणी!
Published on
Updated on

टोकियो : जपानमध्ये सध्या एक विचित्र आणि अनोखा कल दिसून येत आहे. जिथे दुर्दैवी अपघात, हत्या किंवा आत्महत्या झाल्या आहेत, अशा घरांची मागणी वाढली आहे. जपानमध्ये, अशा मालमत्तांना ज्या त्यांच्या काळ्या किंवा भीतिदायक इतिहासासाठी कुप्रसिद्ध आहेत अशा मालमत्तांना ‘जिको बुक्केन’ (घटना घडलेली मालमत्ता) म्हणून ओळखले जाते. सामान्यतः लोक अशा घरांपासून दूर राहणे पसंत करतात; परंतु जपानमधील अनेक लोक आता तिथे राहण्यास तयार आहेत.

मात्सुबारा तानिषी नावाच्या एका जपानी विनोदी कलाकाराने गेल्या दशकात अशा घरांमध्ये वास्तव्य केले आहे, जिथे कोणाचा तरी अकाली मृत्यू झाला होता. तो कबूल करतो की सुरुवातीला त्याला भीती वाटत होती; पण आता ती त्याच्या आयुष्याचा एक सामान्य भाग बनली आहे. जेव्हा एखाद्या मालमत्तेचा इतिहास दुर्दैवी किंवा भीतिदायक असतो, तेव्हा मालकांसाठी ती भाड्याने देणे किंवा विकणे अत्यंत कठीण होते. या समस्येवर उपाय म्हणून, टोकियोमध्ये ‘काचिमोडे’ नावाचे एक नवीन रिअल इस्टेट स्टार्टअप सुरू करण्यात आले. ही कंपनी अशा घरांमध्ये ‘पॅरानॉर्मल’ तपासणी (म्हणजेच भुतांचे अस्तित्व तपासणे) करते. कंपनीचे अध्यक्ष, काझुतोशी कोडामा, स्वतः त्या मालमत्तेत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत एकटे राहतात.

कोणत्याही असामान्य हालचाली टिपण्यासाठी ते खोल्यांमध्ये कॅमेरे, व्हॉईस रेकॉर्डर्स आणि हवेचा दाब मोजणारी उपकरणे (एअर प्रेशर मॉनिटर्स) बसवतात. कोडामा संपूर्ण तपासणीसाठी सुमारे ८८,००० येन (सुमारे ५५० डॉलर्स) शुल्क आकारतात. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अशा ८० हून अधिक मालमत्तांची तपासणी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बहुतांश प्रकरणांमध्ये त्यांना कोणतेही भूत आढळले नाही. ज्या घरांमध्ये विचित्र आवाज येत असल्याची तक्रार होती, तिथे ते आवाज प्रत्यक्षात तापमानातील बदलांमुळे लाकूड आकुंचन पावल्याने किंवा पाईपमधील पाण्याच्या उच्च दाबामुळे निर्माण झालेले होते. कोडामा सांगतात की, एकदा का त्यांनी मालमत्तेला ‘क्लिअरन्स’ देणारा अहवाल दिला की, नवीन भाडेकरू कोणत्याही भीतीशिवाय तिथे राहायला येतात; यामुळे मालमत्तेचे मूल्य कमी करण्याची गरज उरत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news