

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील फोर्ड डीलरशिपमध्ये विकलेला ट्रक एका छोट्या रॉबिनच्या घरट्यामुळे अडकला आहे. चार निळ्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली असून, आता ती टायरवरच्या घरट्यात वाढत आहेत. याचे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या स्थलांतरित पक्षी करार कायद्या (एमबीटीए) अंतर्गत हे घरटे हलवणे गुन्हा असल्याने ग्राहकाला गाडी मिळण्यासाठी पक्ष्यांनी घरटे सोडेपर्यंत थांबावे लागणार आहे.
स्थलांतरित पक्षी करार कायदा (एमबीटीए) अंतर्गत अमेरिकेत बहुतेक स्थलांतरित पक्ष्यांचे घरटे, अंडी व पिल्ली संरक्षित आहेत. रॉबिन पक्षी सामान्य असला तरी त्याचे घरटे तोडणे किंवा हलवणे कायदेशीर गुन्हा ठरतो. पिल्ली साधारण दोन आठवड्यांत घरटे सोडतात, त्यामुळे जूनच्या सुरुवातीला ग्राहकाला गाडी मिळण्याची शक्यता आहे. गाडी विकली गेली आहे, पण ग्राहक संयमाने थांबण्यास तयार आहे.