

पनामा सिटी : वाढत्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी निसर्ग आपली स्वतःची यंत्रणा कशी विकसित करतो, याचा एक थक्क करणारा नमुना पनामाच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये पाहायला मिळत आहे. एका नवीन संशोधनानुसार, पाण्याची कमतरता भासल्यास ही जंगले आपली मुळे जमिनीच्या अधिक खोलवर नेऊन जगण्यासाठी धडपड करत आहेत. तथापि, शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, हवामान बदलाचा वेग पाहता ही ‘रेस्क्यू स्ट्रॅटेजी’ (बचाव धोरण) पुरेशी ठरेलच असे नाही.
जगातील जमिनीवरील जैवविविधतेपैकी निम्म्याहून अधिक जैवविविधता उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळते. महत्त्वाचे म्हणजे, ही जंगले मोठ्या प्रमाणात कार्बन साठवून ठेवतात आणि यातील बराचसा कार्बन जमिनीखालील मुळांमध्ये साठवलेला असतो; पण हवामान बदलामुळे या भागातील तापमान वाढत असून, भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. ‘न्यू फायटोलॉजिस्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाने झाडांच्या मुळांच्या वर्तणुकीवर प्रकाश टाकला आहे. ‘पनामा रेनफॉरेस्ट चेंजेस विथ एक्सपेरिमेंटल ड्रायिंग’ या प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञांनी 2015 पासून पनामाच्या विविध भागांत 32 भूखंडांवर संशोधन केले.
संशोधकांनी जंगलात काही ठिकाणी पारदर्शक छप्पर उभारले, ज्यामुळे 50 ते 70 टक्के पाऊस जमिनीपर्यंत पोहोचू शकला नाही. भूखंडांभोवती खड्डे खोदून त्यात जाड प्लास्टिक लावले गेले, जेणेकरून मुळांना बाहेरून पाणी मिळू नये. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या परिसंस्था शास्त्रज्ञ डॅनिएला कुसॅक यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे जमिनीचे नमुने घेण्यात आले. मुळांच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी तीन प्रमुख पद्धती वापरल्या :
1. पाच वर्षांपर्यंत वर्षातून चार वेळा जमिनीच्या वरच्या थराचे (सुमारे 8 इंच खोल) नमुने गोळा केले. 2. ‘रूट ट्रॅप्स’ वापरले गेले, जे मातीने भरलेले जाळीदार स्तंभ होते. 3. दर तीन महिन्यांनी या स्तंभांमध्ये किती नवीन मुळे वाढली आहेत, याची तपासणी करण्यात आली. झाडे जगण्यासाठी आपली मुळे खोलवर नेऊन ओलावा शोधण्याचा प्रयत्न करत असली, तरी हवामान बदलामुळे येणारे तीव— दुष्काळ या नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त घातक ठरू शकतात. ही जंगले वाचवण्यासाठी केवळ झाडांचे प्रयत्न पुरेसे नसून जागतिक स्तरावर हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.