

लंडन ः निळा देवमासा म्हणजेच ब्ल्यू व्हेल हा पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी आहे. अथांग समुद्राच्या तळाशी जेव्हा एखाद्या महाकाय देवमाशाचा मृत्यू होतो, तेव्हा तो तिथल्या हजारो लहान-मोठ्या जलचर प्राण्यांसाठी पोषक तत्त्वांचा एक ‘प्रचंड मोठा साठा’ बनतो. या भव्य अशा मेजवानीवर ताव मारण्यासाठी समुद्राच्या तळाशी राहणारे जीव तिथे गर्दी करतात. यामध्ये प्रामुख्याने दिसतात ते म्हणजे हाडं फस्त करणारे ‘स्नॉट-फ्लॉवर्स’ आणि चक्क स्नोबोर्डिंग करणाऱ्या ‘स्केल वर्म्स’ सारखे अजब जलचर प्राणी. एका मेलेल्या देवमाशावर फक्त दोन-चार मासे येत नाहीत, तर तब्बल 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींचे हजारो जीव तिथे येऊन राहू लागतात. जणूकाही वाळवंटात अचानक एखादं आलिशान शहर वसल्यासारखं हे दृश्य असतं.
समुद्रातील प्रचंड मोठे मालवाहू ट्रक्स असावेत, तसंच समुद्रात देवमाशांचं अस्तित्व असतं. जेव्हा एखादा देवमासा समुद्रात प्रवास करत असतो, तेव्हा त्याच्या निमित्ताने तब्बल 150 टन (3,00,000 पाऊंडस्) इतका अन्नाचा साठाच वाहत असतो. या दीडशे टनांमध्ये त्याचं मांस, चरबी आणि त्याच्या हाडांचा समावेश असतो. एका महासागरातून दुसऱ्या महासागरात आणि समुद्राच्या पृष्ठभागापासून थेट अथांग खोलीपर्यंत त्याचं अफाट शरीर वाहत असतं. त्याचं हे शरीर म्हणजे जणू समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या जीवांसाठी तयार होणारी एक शाही मेजवानीच आहे. सुरुवातीला शरीरात तयार होणाऱ्या वायूंमुळे हा मृतदेह एखाद्या फुग्यासारखा फुगतो आणि समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगू लागतो. परंतु, त्यानंतर सुरू होतो या महाकाय जीवाचा समुद्राच्या तळाच्या दिशेने प्रवास. सूर्याचा प्रकाश पोहोचणाऱ्या वरच्या थरापासून अर्धवट प्रकाश असलेल्या ‘ट्वायलाईट झोन’ आणि त्यानंतर पूर्णपणे काळोख असलेल्या ‘मिडनाईट झोन’ मधून हा मृतदेह हळूहळू खाली जातो. अखेर हा देवमासा समुद्राच्या सर्वात खोल आणि अंधाऱ्या अशा ‘अबीस’ भागात पोहोचतो. समुद्राचा या भागात सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. अशा ठिकाणी देवमाशाचं हे मृत शरीर इतर जीवांना जीवदान देण्यासाठी विसावलं जातं.