

वॉशिंग्टन : सुमारे दोन वर्षांपूर्वी, ‘नासा’ने एका अंतराळयानाची लघुग्रहावर यशस्वी धडक घडवून इतिहास रचला होता. पृथ्वीला भविष्यात संभाव्य धोकादायक लघुग्रहांपासून वाचवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात होते. मात्र, आता एका नवीन अभ्यासाने या यशस्वी मोहिमेनंतर एक नवी चिंता निर्माण केली आहे. या धडकेमुळे उडालेले लघुग्रहाचे तुकडे अपेक्षेप्रमाणे हालचाल करीत नसल्याचे समोर आले असून, त्यामुळे भविष्यातील अशा मोहिमांच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
26 सप्टेंबर 2022 रोजी ‘नासा’च्या ‘डार्ट’ यानाने पृथ्वीपासून सुमारे 1.1 कोटी किलोमीटर दूर असलेल्या ‘डायमॉर्फोस’ नावाच्या लघुग्रहाला जोरदार धडक दिली होती. ताशी 24,000 किलोमीटरच्या प्रचंड वेगाने झालेल्या या धडकेचा उद्देश हा होता की, अशा प्रकारे एखाद्या लघुग्रहाची दिशा बदलता येते का, हे तपासणे. ही मोहीम अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली. डायमॉर्फोसची केवळ दिशाच बदलली नाही, तर त्याचा आकारही बदलला. या घटनेने ‘कायनेटिक इम्पॅक्टर’ तंत्रज्ञान पृथ्वीच्या संरक्षणासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकते, यावर शिक्कामोर्तब केले. ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ताज्या अभ्यासानुसार, या धडकेनंतर एक अनपेक्षित गुंतागुंत समोर आली आहे. धडकेमुळे डायमॉर्फोसपासून तुटून अंतराळात फेकले गेलेले डझनभर मोठे खडक शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने वागत आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘लिसियाक्यूब’ या छोट्या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना असे आढळले की, हे खडक अपेक्षेपेक्षा जास्त गतीने प्रवास करत आहेत. इतकेच नाही, तर ते अंतराळात विखुरण्याऐवजी एका विशिष्ट पॅटर्नमध्ये पुढे जात आहेत. शास्त्रज्ञांनी सुमारे 104 मोठ्या खडकांचा मागोवा घेतला, ज्यांचा आकार काही इंच ते सुमारे 12 फुटांपर्यंत होता.