

पॅरिस : वास्तविक, एकदा रात्री झोप आल्यानंतर पहाटेपर्यंत शांतचित्ताने झोप लागणे, ही एक प्रकारे दैवी देणगीच. पण, तरीही रोज रात्री झोपेतून अचानक जाग येण्याची समस्या अनेकांना जाणवते. रात्री झोपमोड होणे ही आता जवळपास सामान्य समस्या बनते आहे. बर्याचदा रात्री अनेकांना वॉशरूमला जाण्यासाठी किंवा तहान लागल्यामुळे झोपमोड होते. शिवाय अनेकदा वाईट स्वप्न किंवा झोपताना कूस बदलत असताना सुद्धा जाग येऊन झोपमोड होते. मात्र, जर रात्री दररोज एकाच वेळी झोपमोड होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असे जाणकारांचे मत आहे. रोज रात्री 1 ते 3 दरम्यान झोपमोड होऊन पुन्हा झोप न येणे, हे आजारांचे लक्षण असू शकते, असाही दावा केला जातो. जर्नल ऑफ नेचर अँड सायन्स ऑफ स्लीपमध्ये याबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मायो क्लीनिकनुसार झोपमोड होण्यामागे अनेक कारण असू शकतात. वाढत्या वयामुळे झोपेचे चक्रही बदलते. तसेच काहीवेळा औषधांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा झोपमोड होऊ शकते. दररोज रात्री एकाच वेळी जर झोपमोड होत असेल, तर यामागे ताणतणाव हे सुद्धा एक कारण असू शकते. बराचकाळ तणावाखाली राहिल्यामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. रात्री गाढ झोपेत असताना अचानक झोपमोड होणे, हे लिव्हर संबंधित समस्येचेही लक्षण असू शकते.
‘जर्नल ऑफ नेचर अँड सायन्स ऑफ स्लीप’च्या या अहवालानुसार रात्री अचानकपणे झोपमोड होणे ही लिव्हर खराब होण्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. रात्री दररोज 2 ते 3 या वेळे दरम्यान जर झोपमोड होत असेल, तर फुफ्फुसांसंबंधित समस्या असू शकते. वारंवार झोप मोडल्याने त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही या जर्नलमधील शोधनिबंधात सूचवण्यात आले आहे.