

वॉशिंग्टन : कटलफिश म्हणजे समुद्रातील एक बुद्धिमान जीव, जो रंग, शरीराची ठेवण आणि शिंका म्हणजेच टेंटॅकल्स (tentacles) यांचा वापर करून संवाद साधतो आणि आता, नवीन संशोधनानुसार, ते एकमेकांना हात हलवून म्हणजेच शिंक्यांच्या हालचालींनी ‘हाय’ करत असावेत! हे संशोधन अजून पिअर-रिव्ह्यू झालेलं नाही; पण त्यामध्ये असं आढळलं की, कटलफिश विशिष्ट प्रकारे शिंका हलवून इतर कटलफिशशी संपर्क साधतात. या हालचालींमधून नक्की कोणता संदेश दिला जातो, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
कटलफिशचा संवाद अत्यंत गुंतागुंतीचा असतो. ते त्यांच्या त्वचेचा रंग आणि डिझाईन बदलतात, शरीराच्या हालचाली करतात आणि इतर वेळेस काळं शाई सोडतात, विशेषतः प्रजननाच्या वेळी. नर कटलफिश जेव्हा इतर नर कटलफिशसमोर उभे राहतात, तेव्हा ते आक्रमकतेचे लक्षण म्हणून शिंका फुलवतात किंवा पसरवतात. या नव्या अभ्यासात संशोधकांनी दोन प्रजातींवर लक्ष केंद्रित केलं, Sepia officinalis (सामान्य कटलफिश) आणि Sepia bandensis (ड्वार्फ कटलफिश). त्यांनी असे लक्षात घेतले की या दोन्ही प्रजाती काही विशिष्ट शिंकेच्या हालचाली नियमितपणे करत होत्या.
त्यांनी चार प्रकारच्या ‘आर्म वेव्ह सिग्नल्स’ ओळखल्या, ‘अप’, ‘साइड‘, ‘रोल’ आणि ‘क्राऊन’ अशा चार हालचाली ज्या एकत्र करून विविध नमुने तयार होतात. संशोधकांनी कटलफिशच्या या हालचालींचे व्हिडीओ रेकॉर्ड करून पुन्हा त्यांच्या समोर वाजवले. ‘कटलफिश स्वतःसमोर उभे राहत होते आणि त्या व्हिडीओमध्ये दिसणार्या हालचालींना प्रतिसाद देत होते,’ असं पीएसएल विद्यापीठातील न्यूरोसायंटिस्ट आणि सह-लेखिका सोफी कोहेन-बोदेनेस यांनी सांगितलं. या हालचालींना कटलफिश फक्त व्हिडीओ सरळ ठेवले असतील तेव्हाच प्रतिसाद देत होते, उलटे असले तर नाही, याचा अर्थ अशा हालचालींना ठरावीक अर्थ असतो, जो फक्त योग्य दिशेत पाहिल्यावरच समजतो.
याशिवाय, त्यांनी असंही शोधलं की, या शिंकेच्या हालचालींमुळे पाण्यात तरंग निर्माण होतात. ‘जरी ते एकमेकांना पाहू शकत नसतील, उदाहरणार्थ जर टाकीत एक मोठा खडक असेल, तरी ते हे सिग्नल देत राहतात,’ असं कोहेन-बोदेनेस यांनी सांगितलं. त्यांनी हायड्रोफोनचा वापर करून हे जलतरंग रेकॉर्ड केले, आणि त्या नंतर मूळ सिग्नल, उलट सिग्नल व विस्कळीत सिग्नल प्ले करून कटलफिशचा प्रतिसाद पाहिला. कटलफिशने फक्त मूळ कंपनांवरच प्रतिक्रिया दिली, यावरून या तरंगांच्या क्रमालाही अर्थ असावा, असं सूचित होतं.