Crow Intelligence | कावळे माणसांपेक्षा दुप्पट वेगाने घेतात निर्णय!

ट्युबिंजर विद्यापीठाच्या संशोधनातून चोची आणि पंखांच्या वेगाचे गुपित उघड
Crow Intelligence |
Crow Intelligence | कावळे माणसांपेक्षा दुप्पट वेगाने घेतात निर्णय!File Photo
Published on: 
Updated on: 

बर्लिन : पक्ष्यांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती नेहमीच संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय राहिली आहे. आता यात एका नव्या आणि थक्क करणाऱ्या संशोधनाची भर पडली आहे. जर्मनीच्या ट्युबिंजर विद्यापीठामधील संशोधक फिलिप श्मिडबॉयर आणि प्राध्यापक आंद्रेआस नीर यांनी केलेल्या नवीन अभ्यासानुसार, कावळे हे माणूस आणि माकडांच्या तुलनेत दुप्पट वेगाने दृश्य निर्णय (व्हिज्युअल डिसिजन्स) घेऊ शकतात. ‘सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

संशोधकांनी दोन कॅरिअन कावळ्यांवर एक प्रयोग केला. टचस्क्रीनवर हलणाऱ्या ठिपक्यांची दिशा डावीकडे आहे की उजवीकडे, हे ओळखून कावळ्यांना योग्य दिशेला चोच मारून उत्तर द्यायचे होते. या प्रयोगात कावळ्यांनी अत्यंत अचूकता राखत अवघ्या २३५ मिलिसेकंदांमध्ये (एका सेकंदाच्या चौथ्या भागापेक्षाही कमी वेळात) योग्य निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ठिपक्यांची दिशा स्पष्ट नसतानाही त्यांचे निर्णय अंदाजित उत्तरांपेक्षा कैक पटीने चांगले होते, तर स्पष्ट सिग्नल असताना त्यांनी जवळपास १०० टक्के अचूकता दाखवली.

कावळ्यांचे मेंदू कसे करतात काम?

कावळ्यांच्या मेंदूतील ‘निडोपॅलियम कॉडोलेटरले’ या भागातील चेतापेशींच्या (न्यूरॉन्स) हालचालींचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, ठिपके स्क्रीनवर दिसल्यानंतर अवघ्या ७० मिलिसेकंदांच्या आत कावळ्यांच्या मेंदूने संभाव्य दिशांमधील फरक ओळखण्यास सुरुवात केली होती. सस्तनधारी प्राण्यांप्रमाणे पक्ष्यांच्या मेंदूत स्तरांमध्ये विभागलेला सेरेब्रल कॉर्टेक्स नसतो, तरीही माहितीचे मूल्यमापन आणि निर्णय घेण्याच्या मूलभूत सिद्धांतांचे पालन करत त्यांचे मेंदू मानवासारखेच काम करतात. उडताना हवेत अत्यंत वेगाने आणि अचूक युक्ति वाद करणे, तसेच चोचीच्या सहाय्याने खाद्य शोधताना होणाऱ्या जलद हालचालींसाठी निसर्गाने कावळ्यांना ही कमालीची वेगवान क्षमता दिली असावी, असे संशोधकांचे मत आहे.