Crows Intelligence | माणसांपेक्षाही दुप्पट वेगाने निर्णय घेऊ शकतात कावळे

नव्या संशोधनातून थक्क करणारी माहिती समोर
Crows Intelligence |
Crows Intelligence | माणसांपेक्षाही दुप्पट वेगाने निर्णय घेऊ शकतात कावळे
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली/बर्लिन : अवजारे वापरणे, माणसांचे चेहरे लक्षात ठेवून वैर बाळगणे आणि अगदी आपल्या सोबत्याच्या मृत्यूनंतर एकत्र जमणे अशा अनेक हुशार सवयींसाठी कावळे आधीच ओळखले जातात. मात्र, आता एका नव्या संशोधनाने पक्षी जगतातील त्यांच्या हुशारीचा आणखी एक मोठा पुरावा दिला आहे. कावळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये माणूस आणि माकडांपेक्षाही अधिक वेगाने निर्णय घेऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.

‘सायन्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये गुरुवारी (२२ ऑक्टोबर) प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, कावळ्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रयोग करण्यात आले. यात दोन ‘कॅरियन क्रो’ (Corvus corone) प्रजातीच्या कावळ्यांनी स्क्रीनवर हलणाऱ्या ठिपक्यांची दिशा ओळखण्यासाठी सरासरी अवघ्या २३५ मिलिसेकंदांचा (एका सेकंदाच्या पाव भागापेक्षाही कमी) वेळ घेतला. मानवावर यापूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या चाचण्यांच्या तुलनेत कावळ्यांचा हा वेग आश्चर्यकारकपणे अधिक असल्याचे दिसून आले.

या चाचण्यांदरम्यान कावळ्यांचे निर्णय केवळ वेगवान नव्हते, तर ते अत्यंत अचूकही होते. त्यांच्या मेंदूच्या लहरींची तपासणी केली असता, त्यांची निर्णय घेण्याची जैविक प्रक्रिया ही नरवानर (Primates) आणि मानवाशी खूप मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झाले. पक्षी आणि सस्तन प्राणी उत्क्रांतीच्या प्रवासात ३१ कोटी वर्षांपूर्वीच एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तरीही दोघांच्या मेंदूतील ही कार्यपद्धती सारखी कशी, यावर स्पष्टीकरण देताना जर्मनीतील तुबिंगेन विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोबायोलॉजी’चे संचालक आणि या अभ्यासाचे सह-लेखक प्रा. आंद्रियास नीडर म्हणाले, ‘‘यावरून असे दिसून येते की, एकाच प्रकारच्या गुंतागुंतीच्या बौद्धिक आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाच्या उत्क्रांती प्रक्रियेने पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये स्वतंत्रपणे एकाच प्रकारची जैविक यंत्रणा विकसित केली असावी.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news