

वॉशिंग्टन : जगभरात कोव्हिड-19 लसीकरणावर संशोधन सुरू असताना, फायझरच्या लसीचा डोळ्यांच्या आरोग्याशी संबंध असल्याचा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. तुर्कस्तानमधील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात, लसीचा डोळ्यांच्या कॉर्नियावर (डोळ्यांचा पुढील पारदर्शक पडदा) होणार्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले. ‘ऑप्थॅल्मिक एपिडेमियोलॉजी’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये यासंदर्भात एक संशोधकांचा लेख प्रकाशित झाला आहे. संबंधित संशोधकांनी या अभ्यासात 64 लोकांच्या डोळ्यांची तपासणी केली. फायझर लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी आणि दुसरा डोस घेतल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांच्या कॉर्नियाच्या आतील थरातील (एंडोथेलियम) बदलांची नोंद घेण्यात आली.
अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, फायझर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल दिसून आले. लसीकरणानंतर कॉर्नियाची जाडी सरासरी 528 मायक्रोमीटरवरून 542 मायक्रोमीटरपर्यंत वाढल्याचे आढळले. कॉर्नियाला निरोगी आणि पारदर्शक ठेवणार्या एंडोथेलियल पेशींच्या संख्येत सुमारे 8 टक्क्यांची घट झाली. तसेच या पेशींच्या आकारात अधिक असमानता दिसून आली, जे पेशींवर ताण येत असल्याचे लक्षण मानले जाते. निरोगी षटकोनी आकार असलेल्या पेशींची संख्या 50 टक्क्यांवरून 48 टक्क्यांपर्यंत घसरली. संशोधकांच्या मते, हे बदल तात्पुरते असू शकतात आणि निरोगी डोळे असलेल्या व्यक्तींवर त्याचा लगेच परिणाम होणार नाही. मात्र, जर हे बदल दीर्घकाळ टिकून राहिले, तर भविष्यात कॉर्नियाला सूज येणे, द़ृष्टी अंधुक होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये कायमचे अंधत्व येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.