16000 Airports World Largest Aviation | ‘या’ देशात आहेत तब्बल 16 हजार विमानतळ!

16000 Airports World Largest Aviation |
16000 Airports World Largest Aviation | ‘या’ देशात आहेत तब्बल 16 हजार विमानतळ!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगात जर कमीत कमी वेळेत लांबचा पल्ला गाठायचा असेल, तर विमान प्रवास हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) वाढवण्यासाठी जगातील विविध देशांनी आपापल्या भागात विमानतळांचे जाळे विणले आहे. परंतु, जगात सर्वाधिक विमानतळ कोणत्या देशात आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? जगात एक असा अनोखा देश आहे, ज्याने आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या शहरापासून ते अगदी खेड्यापाड्यांपर्यंत विमानतळ उभारले आहेत. या देशात एकूण 16 हजारांहून अधिक विमानतळ आहेत. विमानतळांची संख्या इतकी अफाट असल्यामुळे येथील लोक नातेवाईकांना भेटण्यासाठी कारऐवजी स्वतःच्या विमानाने (जेट) जाणे अधिक पसंत करतात. चला तर मग, जाणून घेऊया या रंजक देशाबद्दल सविस्तर माहिती.

जगात सर्वाधिक विमानतळ असणारा एकमेव देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेत विमानतळांची एकूण संख्या तब्बल 16 हजार 116 इतकी आहे. या देशात विमानतळांची संख्या इतकी जास्त आहे की, तुम्ही देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यातून आणि कोणत्याही ठिकाणासाठी सहज उड्डाण करू शकता. ‘CIA. gov’ च्या एका अहवालानुसार, अमेरिकेत जागोजागी उभारण्यात आलेले हे विमानतळ व्यापार वाढवण्यासाठी, खासगी उपयोगासाठी आणि लष्करी कारणांसाठी (सैन्य उद्देश) विकसित करण्यात आले आहेत.

अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमानतळ असण्यामागे त्याचे अफाट क्षेत्रफळ (भूभाग) आणि आर्थिक सुबत्ता ही मुख्य कारणे आहेत. देशातील विविध भागांना एकमेकांशी जोडण्यासाठी अमेरिकेत रस्ते आणि रेल्वेचेही उत्तम नेटवर्क आहे. परंतु, रस्ते किंवा रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिथे खूप जास्त वेळ लागतो. याउलट, विमानाने लोक अगदी कमी वेळेत कोणत्याही शहरात पोहोचू शकतात. वेळेची बचत व्हावी, याच उद्देशाने अमेरिकेने आपल्या देशातील प्रत्येक भागात विमानतळांचे एक मोठे जाळे तयार केले आहे. यामुळेच अमेरिकेत केवळ व्यावसायिक विमानेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर्सचा वापर रोजच्या प्रवासासाठी केला जातो.

logo
Pudhari News
pudhari.news