

नवी दिल्ली : आपण रोजच काही गोष्टी पाहत असतो, पण त्या तशाच का आहेत याची आपल्याला माहिती नसते. कधी तरी त्याबाबतचे कुतूहलही वाटते, पण खुलासा होत नसतो. त्यामध्येच भारतातील प्रत्येक मोबाईल क्रमांकाच्या पुढे +91 हा क्रमांक कशासाठी असतो, या प्रश्नाचा समावेश आहे.
+91 हा देशाचा कोड आहे. मात्र, भारताला हा कोड कशासाठी आणि कोणत्या आधारावर देण्यात आला? यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. भारतात +91 हा देश कोड वापरला जातो. अर्थातच, इतर देशांसाठी तो वेगळा असतो. या कोडला ‘इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन’ म्हणतात, जी संयुक्त राष्ट्रसंघाचा एक भाग असलेली संस्था आहे. हा कोड काय असेल, हे फक्त या एजन्सीद्वारेच ठरवले जाते. याचा मूळ उद्देश देशातील संचार व्यवस्था जगभरात सुरळीत आणि पद्धतशीरपणे चालवणे हा आहे. भारताला देण्यात आलेला हा कंट्री कोड देशांतर्गत वापरला नाही तरी काही फरक पडत नाही; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर फोन करण्यासाठी हा कोड वापरणे बंधनकारक आहे. हा कोड आंतरराष्ट्रीय कॉलिंग लक्षात घेऊन वापरला गेला. जगभरातील 193 देश हा कोड वापरतात, जो प्रत्येक देशासाठी वेगळा आहे. अमेरिकेचा कोड +1 आहे, ब्रिटनचा +44 आहे आणि चीनचा +86 आहे. आयटीयूने कंट्री कोड प्रणाली विकसित केली, त्यावेळी प्रत्येक देशाला वेगळा कोड देण्यात आला. त्याचवेळी भारताला +91 हा कोड मिळाला होता. विविध देशांमधील कॉलिंग सुरळीत करण्यासाठी एक मान प्रणाली आवश्यक असल्याने कंट्री कोडचा वापर सुरू झाला.