असेही देश, जेथे नसते रविवारी सुट्टी!

countries no Sunday holiday
असेही देश, जेथे नसते रविवारी सुट्टी!Pudhari File Photo
Published on
Updated on

रविवार म्हटले की निवांतपणा. रविवार म्हणजे उशिरा उठणे आणि रविवार म्हणजे नेहमीच्या दिवसापेक्षा थोडा वेळ स्वत:साठी काढणे. कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणे, चित्रपट, नाटक पाहणे अशा गोष्टींसाठीदेखील हा रविवार राखीव असतो. पण, जगात असे काही देश आहेत जेथे रविवारी सुट्टी मिळत नाही आणि कामावर जावे लागते. काही दिवसांपूर्वी लार्सन अँड टूब्राेचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्याला 90 तास काम करण्याचा तसेच रविवारी घरी बसण्यापेक्षा ऑफिसला येऊन काम करा, असा सल्ला दिला होता. यामुळे देशात एका नव्या वादाला सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टी नसणार्‍या देशांवर एक द़ृष्टिक्षेप.

इस्रायल

इस्रायलमध्ये रविवार हा कामकाजाचा दिवस असतो. यामागचे कारण म्हणजे इस्रायलमधील ज्यू संस्कृती. ज्यू धर्मात शबात हा पवित्र दिवस शुक्रवारी सूर्यास्तापासून शनिवारी सूर्यास्तापर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे इस्रायलमध्ये शुक्रवार आणि शनिवार हे वीकेंड मानले जातात. लोक रविवारपासून गुरुवारीपर्यंत काम करतात आणि अर्थातच शुक्रवार व शनिवारी सुट्टी घेतात.

बांगला देश

भारताचा शेजारी देश बांगला देशमध्येही रविवारला सुट्टी नसते. येथे वीकेंड शुक्रवार आणि शनिवारला असतो. बांगला देशमध्ये बहुसंख्य लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. त्यामुळे शुक्रवारचा दिवस नमाजसाठी महत्त्वाचा मानला जातो, म्हणूनच या दिवशी सुट्टी ठेवली जाते.

मलेशिया

मलेशियामध्ये प्रत्येक राज्याचा वीकेंड वेगळा असतो. उदाहरणार्थ, जोहोर, केदाह, केलंतन आणि टेरेंगानु या राज्यांमध्ये वीकेंड शुक्रवार आणि शनिवारला असतो. कारण इस्लाम धर्मात शुक्रवारी नमाजसाठी विशेष महत्त्व असते. मात्र, राजधानी कुआलालंपूरसारख्या ठिकाणी वीकेंड शनिवार आणि रविवारला असतो. काही क्षेत्रांमध्ये मात्र रविवारीही काम करावे लागते.

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानमध्ये कामाचा आठवडा रविवारी सुरू होतो आणि गुरुवारी संपतो. शुक्रवारी आणि शनिवारी वीकेंड असतो. इतर इस्लामिक देशांप्रमाणेच अफगाणिस्तानमध्येही शुक्रवारी लोक नमाजसाठी वेळ देतात. यासाठी सर्व कार्यालये, सरकारी कार्यालये बंद ठेवली जातात.

आखाती देश

बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसारख्या आखाती देशांमध्ये रविवार ते गुरुवारपर्यंत कामाचा आठवडा असतो. शुक्रवार आणि शनिवारला वीकेंड असतो. यामागील कारण म्हणजे इस्लाम धर्मात शुक्रवारी नमाजसाठी दिलेला महत्त्वाचा वेळ होय. अल्जेरिया, इजिप्त, इराक, जॉर्डन, लिबिया, ओमान, सीरिया आणि येमेनसारख्या देशांमध्येही शुक्रवारी आणि शनिवारी वीकेंड साजरा केला जातो. जगातील अशा अनेक देशांमध्ये रविवारला सुट्टी असते. मात्र, काही देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांमुळे रविवार हा कामकाजाचा दिवस मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news