

लंडन : मानवी आयुर्मान वाढवून ते तब्बल १,४०० वर्षांपर्यंत नेणे शक्य आहे, असा खळबळजनक दावा स्वीडिश तत्त्वज्ञ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी प्राध्यापक निक बोस्ट्रॉम यांनी केला आहे. 'सुपरइंटेलिजंट एआय' म्हणजेच अतिप्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यशस्वी विकासामुळे हे शक्य होऊ शकते, असे त्यांचे मत आहे.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना बोस्ट्रॉम म्हणाले की, "जर मानवाच्या शरीराची झीज होण्याची (वृद्धत्वाची) प्रक्रिया थांबवली, तर आपले सरासरी आयुर्मान १,२०० ते १,४०० वर्षांपर्यंत जाऊ शकते. आजवरच्या नोंदीनुसार, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती फ्रान्सच्या जीन कॅलमेंट या होत्या, ज्या १९९७ पर्यंत १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगल्या. बोस्ट्रॉम यांचा दावा यापेक्षा ११ पटीने अधिक आहे. ही कल्पना एखाद्या हॉलीवूड सायन्स-फिक्शन चित्रपटासारखी (उदा. 'द एज ऑफ ॲडलाइन', 'कॅप्टन अमेरिका' किंवा 'वूल्व्हरिन') वाटत असली, तरी बोस्ट्रॉम यांनी २०२६ मधील त्यांच्या 'ऑप्टिमल टायमिंग फॉर सुपरइंटेलिजन्स' या शोधनिबंधात यामागील गणित मांडले आहे.
जर शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या म्हातारे होण्याची प्रक्रिया थांबवली, तर वय वाढल्यामुळे वाढणारा मृत्यूचा धोका नाहीसा होईल. विकसित देशांमधील २० ते २५ वयोगटातील निरोगी तरुणांचा वार्षिक मृत्युदर अंदाजे ०.०५ ते ०.०८ टक्के इतका असतो. बोस्ट्रॉम यांनी उदाहरणासाठी ०.०७ टक्के हा आकडा गृहीत धरला आहे. जर संपूर्ण आयुष्यभर मृत्यूचा हा वार्षिक धोका ०.०७ टक्के इतकाच स्थिर राहिला, तर गणितानुसार मानवाचे अपेक्षित आयुर्मान सुमारे १,४०० वर्षे इतके असू शकते. मात्र, हा केवळ एक गणितीय अंदाज आहे. याचा अर्थ असा नाही की माणूस अपघात, हिंसाचार किंवा इतर कारणांमुळे मरणारच नाही; तर केवळ वृद्धत्वामुळे होणारे मृत्यू टळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘सुपरइंटेलिजंट एआय’ कशी मदत करेल?
जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि वृद्धत्वविरोधी संशोधनाला 'सुपरइंटेलिजंट एआय' प्रचंड गती देऊ शकतो, असा बोस्ट्रॉम यांचा युक्तिवाद आहे. त्यांच्या शोधनिबंधानुसार, भविष्यात एआय शास्त्रज्ञांना पुढील गोष्टींसाठी मदत करू शकेल. सध्या दुर्धर किंवा असाध्य असलेल्या आजारांवर प्रभावी उपचार शोधणे. वयानुसार पेशी आणि ऊतींची झालेली झीज भरून काढणे किंवा ती पूर्ववत करणे. निकामी झालेले अवयव आणि सांधे पुन्हा कार्यान्वित करणे. कर्करोगावर अधिक अचूक उपचार विकसित करणे. अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित आजारांवर मात करणे. "सुपरइंटेलिजन्समुळे जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील प्रगतीला अभूतपूर्व वेग येईल. रुग्णाच्या मेंदूतील नष्ट झालेल्या चेतापेशी (neurons) पुन्हा निर्माण करून अल्झायमरसारखा आजार बरा करण्याची कल्पना करून पहा," असेही बोस्ट्रॉम यांनी आपल्या शोधनिबंधात नमूद केले आहे.