हाँगकाँग : कोरोना रुग्णांची देखभाल करण्यासाठी आता 'ग्रेस' नावाचा खास रोबो विकसित करण्यात आला आहे. हाँगकाँगची कंपनी हॅनसनने हा स्त्री रूपातील रोबो विकसित केला आहे. हा रोबो आरोग्य कर्मचार्यांच्या मदतीसाठी बनवलेला आहे.
हा रोबो आयसोलेट कोरोना रुग्णांची देखभाल एखाद्या परिचारिकेप्रमाणेच करू शकतो. त्याच्या वापरामुळे आरोग्य कर्मचारी संक्रमणापासून दूर राहू शकतात. निळ्या रंगाचा युनिफॉर्म घातलेल्या ग्रेस रोबोमध्ये थर्मल कॅमेरा फिट करण्यात आलेला आहे. हा कॅमेरा रुग्णाचे तापमान तपासून त्याची प्रकृती कशी आहे हे पाहू शकतो. हा रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने रुग्णाच्या अडचणी समजून घेऊन त्याला इंग्रजी, मँडेरीन व कॅटोनीज भाषेत प्रत्युत्तर देऊ शकतो. हाँगकाँगच्या रोबोटिक्स वर्कशॉपमध्ये त्याच्या बोलण्याची चाचणीही घेण्यात आली आहे. हा रोबो बायो रीडिंग, टॉक थेरेपी आणि अन्य आरोग्य तपासणीशी संबंधित मदत करू शकतो. 'ग्रेस' चेहर्यावरील 48 पेक्षाही अधिक प्रकारचे हावभावही ओळखू शकते. सुरुवातीला हा रोबो चीनसह जपान आणि दक्षिण कोरियाच्या आरोग्य केंद्रांमध्ये ठेवला जाणार आहे.