

वॉशिंग्टन: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या ‘सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा’ आणि प्रकाश लहरींच्या पॅटर्नचा वापर करून अतिसूक्ष्म ‘स्विमिंग रोबों’ना दिशा दाखवण्याची नवीन पद्धत संशोधकांनी विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात मानवी शरीरात औषधे पोहोचवण्यासाठी किंवा सूक्ष्म उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
मानवी शरीराच्या आत काम करू शकतील अशा सूक्ष्म रोबोंची निर्मिती करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांचे नियंत्रण. जर या रोबोंमध्ये सेन्सर्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स बसवले, तर त्यांचा आकार मोठा होतो. यावर उपाय म्हणून संशोधकांनी ‘कृत्रिम अवकाश-काळ’ तयार केला, ज्याद्वारे या यंत्रांना अंतराळातील प्रकाश किंवा अवकाशयानाप्रमाणे प्रवास करण्यास प्रवृत्त केले जाते. हे रोबो केवळ 100 मायक्रॉन (मानवी केसाच्या रुंदीइतके) आकाराचे आहेत. या ‘इलेक्ट्रोकायनेटिक’ (एघ) रोबोटस्वर लहान सौर पेशी आणि दोन्ही टोकांना इलेक्ट्रोडस् बसवण्यात आले आहेत. जेव्हा यावर प्रकाश पडतो, तेव्हा विद्युत क्षेत्र निर्माण होऊन हे रोबोटस् द्रावणामध्ये पुढे ढकलले जातात.
एका साध्या चक्रव्यूहातून या रोबोंना अचूक ठिकाणी पोहोचवण्याचे आव्हान संशोधकांसमोर होते. सामान्य सापेक्षतावादानुसार, गुरुत्वाकर्षण हे वस्तुमानाभोवतीच्या ’‘स्पेस-टाईम’ला वाकवते. ज्याप्रमाणे प्रकाश अवकाशातून सरळ रेषेत जात असताना मोठ्या दीर्घिकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे वाकलेला दिसतो (ज्याला ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ म्हणतात), त्याच तत्त्वाचा वापर येथे करण्यात आला. अभ्यासाचे मुख्य लेखक मार्क मिस्किन यांच्या मते, ‘आम्ही दाखवून दिले की, विशिष्ट प्रकाश क्षेत्रांमध्ये हे सूक्ष्म रोबो अगदी तशाच प्रकारे वागतात जसा प्रकाश सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार वागतो. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण वस्तूंना एकत्र खेचते, त्याच कल्पनांचा वापर करून आम्ही या रोबोंना एका विशिष्ट बिंदूकडे अचूकपणे वळवू शकतो.’ हे तंत्रज्ञान विकसित झाल्यास, मानवी शरीरातील अत्यंत क्लिष्ट नसांमधून किंवा अवयवांमधून प्रवास करून हे रोबो शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करण्यासाठी वापरता येतील. अवजड सेन्सर्सशिवाय केवळ प्रकाशाच्या मदतीने त्यांचे नियंत्रण करणे आता शक्य होणार आहे.