London Marathon : मृत्यूला गवसणी घालून लंडन मॅरेथॉन पूर्ण

रेल्वे ट्रॅकवर हृदय बंद पडलेल्या तरुणाची जिद्द!
London Marathon
मृत्यूला गवसणी घालून लंडन मॅरेथॉन पूर्ण
Published on
Updated on

लंडन : १८ महिन्यांपूर्वी ज्याचे हृदय तब्बल १३ मिनिटे बंद पडले होते, अशा एका १८ वर्षीय तरुणाने रविवारी लंडन मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून सर्वांना थक्क केले आहे. माईक अँगलंड असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे.

१५ नोव्हेंबर २०२४ रोजी, माईक उत्तर लंडनमध्ये मित्रांसोबत प्रवास करत असताना मोर पार्क स्टेशनवर धावताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर पडला. माईक ज्या लाईव्ह ट्रॅकवर पडला, त्यातून ७५० वोल्‍टचा वीजप्रवाह वाहत होता. इतका मोठा धक्का बसल्यानंतर त्याचे हृदय जागीच बंद पडले होते. माईकचे प्राण वाचवण्यात त्याच्या मित्रांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोलाची भूमिका बजावली. दारा पेटन या २१ वर्षीय इलेक्ट्रिशियनने स्वतःचा जीव धोक्यात घालून माईकला ट्रॅकवरून ओढले. त्याने माईकच्या त्वचेला स्पर्श न करता जॅकेट पकडून त्याला बाजूला केले. टॉमी गुणाने दोन दिवसांपूर्वीच फर्स्ट एड (प्रथमोपचार) कोर्स केला होता. रुग्णवाहिका येईपर्यंतच्या १३ मिनिटांच्या काळात त्याने माईकला सतत ‘सीपीआर’ दिला.

...अन्‌‍ हृदय पुन्हा धडधडू लागले!

एअर ॲम्ब्युलन्स टीमने घटनास्थळी पोहोचून डिफिब्रिलेटरचा वापर केला आणि माईकचे हृदय पुन्हा सुरू झाले. गंभीर अवस्थेमुळे त्याला काही काळ कोमात ठेवावे लागले होते. कोमातून बाहेर आल्यावर त्याला काही काळ विस्मरणाचा त्रास झाला; पण हळूहळू तो पूर्णपणे बरा झाला.

कृतज्ञतेपोटी धावली मॅरेथॉन

ज्या एअर ॲम्ब्युलन्स टीमने माईकचे प्राण वाचवले, त्यांच्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने माईकने आणि त्याचा भाऊ लियामने लंडन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. दोघांनी ४ तास ५९ मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली. माईकने ‌‘गो फंड मी‌’ पेजच्या माध्यमातून एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीसाठी आतापर्यंत सुमारे १९,००० पाऊंड (सुमारे २० लाख रुपये) जमा केले आहेत.‌ ‘मी किती नशीबवान आहे हे यावरून दिसते,‌’ असे माईकने फिनिश लाईन पार केल्यानंतर भावुक होत सांगितले. मृत्यूच्या दाढेतून परत येऊन अवघ्या १८ महिन्यांत मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या माईकचे जगभर कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news