

लॉस एंजेलिस : दक्षिण कॅलिफोर्नियातील रहिवाशांसाठी हा आठवडा आश्चर्यकारक ठरला. ज्या भागात सहसा कधीच दिसत नाही, अशा ठिकाणी या आठवड्यात आकाशात अद्भुत ‘नॉर्दर्न लाईटस्’ किंवा ‘ऑरोरा’ पाहायला मिळाले. नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या मते, पृथ्वीवर गेल्या 23 वर्षांतील सर्वात शक्तिशाली ‘सौर विकिरण वादळ’ (Solar Radiation Storm) धडकल्यामुळे हा चमत्कार घडला आहे.
सूर्यावर झालेल्या एका शक्तिशाली ‘X-क्लास’ सौर उद्रेकामुळे (Solar Flare) चार्ज झालेल्या कणांचे ढग वेगाने पृथ्वीच्या दिशेने आले. या कणांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर इतका प्रभाव टाकला की, एरवी केवळ उत्तर ध—ुवाजवळ दिसणारा हा प्रकाश दक्षिण कॅलिफोर्नियासारख्या कमी अक्षांशाच्या भागातही दिसू लागला. भू-चुंबकीय स्केलवर हे वादळ ‘G4’ श्रेणीत मोजले गेले, ज्याला ‘गंभीर’ (Severe) मानले जाते. या पातळीवरील वादळांमुळे काही धोकेही निर्माण होतात: रेडिओ संपर्क : रेडिओ कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
सॅटेलाईट : कक्षेत फिरणार्या उपग्रहांवर याचा परिणाम होऊ शकतो. पॉवर ग्रिड : जमिनीवरील वीज यंत्रणांवर ताण येऊ शकतो. अभियंते आणि अंतराळ हवामान तज्ज्ञ अशा घटनांवर बारीक लक्ष ठेवून असतात. कारण, यामुळे तंत्रज्ञानाचे नुकसान होऊ शकते. काही माध्यमांनी याचे वर्णन दशकातील सर्वात मोठे वादळ असे केले आहे; परंतु त्यात थोडा फरक आहे. मे 2024 मधील ‘मदर्स डे’ ला आलेले वादळ G5 श्रेणीतील होते, जे अलीकडील काळातील सर्वात शक्तिशाली वादळ मानले जाते. मात्र, या आठवड्यातील वादळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ‘रेडिएशन’ (विकिरण) घटक अत्यंत प्रबळ होता, जो गेल्या 23 वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात दिसला नव्हता.