

वॉशिंग्टन : ‘नासा’चे अनुभवी अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावरून (आयएसएस) पृथ्वीवरील एका दुर्मीळ आणि नेत्रदीपक प्रकाशझोतातील घटनांचे विलक्षण व्हिडीओ टिपले आहेत. या घटनांना वैज्ञानिक भाषेत Transient Luminous Events ( TLEs) किंवा ‘स्प्राईट्स’ असेही म्हणतात. हे द़ृश्य ‘आयएसएस’ दक्षिण अमेरिका परिसरावरून कक्षेत असताना टिपले गेले. स्प्राईटस् हे अत्यंत वेगाने होणारे, तेजस्वी आणि रंगीबेरंगी प्रकाशाचे झोत असतात, जे सामान्य विजेपेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. हे बहुतांश वेळा शक्तिशाली वादळांदरम्यान उंच वातावरणात निर्माण होतात.
डॉन पेटिट यांनी या स्प्राईटस्चे द़ृश्य पृथ्वीच्या ‘नादिर’ बिंदूपासून, म्हणजे त्यांच्या थेट खाली असलेल्या बिंदूपासून पाहिले. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, ‘हे थोडं गीकी वाटेल, पण जे ‘अतिउत्साही’ विज्ञानप्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास आहे. हे आहे TLEs म्हणजेच वरील वातावरणातील विजेचे द़ृश्य, जे थेट खाली पाहताना टिपले गेले आहे.’ या व्हिडीओत अॅमेझॉन बेसिनवर सुमारे सहा सेकंदांचे स्प्राईटस् स्पष्ट दिसत आहेत. ही पहिली वेळ नाही की ‘आयएसएस’ वरून असे स्प्राईटस् टिपले गेले आहेत. 2024 मध्येही नासाचे दुसरे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक यांनी ‘रेड स्प्राईटस्’ या अत्यंत दुर्मीळ आणि आकर्षक प्रकाशघटनांचे थेट दर्शन घेतले होते. रेड स्प्राईटस् हे विशेषतः तीव्र वादळांदरम्यान निर्माण होतात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने नव्हे, तर थेट वातावरणाच्या वरच्या थराकडे झेप घेतात. सामान्य वीज ही जशी जमिनीकडे झेपावते, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने हे स्प्राईटस् वरच्या दिशेने प्रवास करतात.