

नवी दिल्ली : दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारी एशियन गोल्डन कॅट ही एक अत्यंत दुर्मीळ आणि आकर्षक मांजर प्रजाती आहे. हे मांजर त्याच्या रंगामुळे ‘अनेक वेशभूषा करणारी मांजर’ म्हणून ओळखले जाते. या मांजरात सोनेरी, लालसर तपकिरी, राखाडी आणि अगदी काळे असे विविध रंग प्रकार आढळतात. या मांजराची सर्वात धक्कादायक आणि खास गोष्ट म्हणजे तिची शिकार करण्याची पद्धत.
कबूतरपेक्षा मोठ्या आकाराच्या पक्ष्यांची शिकार केल्यानंतर हे मांजर त्यांना खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पिसे उपटून काढते, अशी माहिती एका निरीक्षणातून पुढे आली आहे. एशियन गोल्डन कॅटमध्ये आपल्या आकारापेक्षा खूप मोठी शिकार करण्याचे सामर्थ्य आहे. त्यात म्हशीचे वासरू, लहान हरणासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. या मांजराची प्रजातील मुख्यत्वे दक्षिण आणि आग्नेय आशियातील जंगलांमध्ये आढळते.
नैसर्गिक अधिवास कमी होत असल्यामुळे ही प्रजाती सध्या धोक्यात आहे. या मांजराच्या प्रजातीचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी जगभरातील प्राणीप्रेमींतून होत आहे. अत्यंत दुर्मीळ असणारी ही प्रजाती नष्ट झाली तर त्याचा निसर्गावरही परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. एशियन गोल्डन कॅट केवळ त्याच्या विविध रंगांमुळेच नाही, तर तिच्या विशेष शिकारीच्या सवयींमुळेही वन्यजीव शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरले आहे.