वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी अंतराळात रंगीबेरंगी फुलपाखरासारखी आकृती पाहिली असून त्याच्या प्रतिमाही टिपल्या आहेत. निळ्या, जांभळ्या व लालसर रंगाची ही आकृती म्हणजे एक नेब्युला आहे. वायूंच्या विशाल ढगाला 'नेब्युला' असे म्हटले जाते. एखाद्या मोठ्या तार्याच्या भोवती असा नेब्युला तयार होत असतो.
काहीवेळा नेब्युलाचा आकार अगदी मानवी डोळ्यांसारखाही तयार होत असतो. असे अवकाशीय नेत्रही लोकांचे लक्ष वेधून घेत असते. आता तयार झालेला हा नेब्युला फुलपाखरासारखा दिसतो. त्याचा आकार व रंगसंगतीही तशीच आहे. 'व्हेरी लार्ज टेलिस्कोप' च्या सहाय्याने या नेब्युलाची प्रतिमा टिपण्यात आली आहे. त्याला 'एनजीसी 2899' असे नाव देण्यात आले आहे. हा नेब्युला पृथ्वीपासून 3000 ते 6500 प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे. अतिनील विकिरण तार्याच्या चारही बाजूंनी आणि वायूंच्या गोळ्याला प्रकाशित करीत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये विविध रंग आणि चमकदार प्रकाश निर्माण होतो.