

लंडन : रंगांधळेपणा असलेल्या व्यक्तींना मूत्राशयाचा कर्करोग झाल्यास त्यांच्या जगण्याची शक्यता कमी असू शकते का? ‘नेचर हेल्थ’ या जर्नलमध्ये 15 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या एका प्राथमिक संशोधनाने असाच एक खळबळजनक दावा केला आहे.
संशोधकांनी सुमारे 135 रंगअंधत्व आणि मूत्राशयाचा कर्करोग असलेल्या रुग्णांच्या माहितीचा तुलनात्मक अभ्यास केला. यासाठी 27.5 कोटींहून अधिक रुग्णांच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नोंदींचा (TriNetX) वापर करण्यात आला. या संशोधनातून पुढील गोष्टी समोर आल्या आहेत. रंगांधळेपणा असलेल्या कर्करोग रुग्णांचे आयुर्मान, द़ृष्टीदोष नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी आढळले. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर 20 वर्षांच्या कालावधीत, रंगअंध व्यक्तींचा मृत्यूचा धोका 52 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले.
मूत्राशयाच्या कर्करोगाचे सर्वात प्रमुख आणि सुरुवातीचे लक्षण म्हणजे लघवीवाटे रक्त येणे. मात्र, ज्या व्यक्तींना रंगांमधील फरक ओळखता येत नाही (विशेषतः लाल रंग ओळखण्यात अडचण येते), त्यांना लघवीतील रक्ताचा अंश ओळखणे कठीण जाते. यामुळे आजाराचे निदान होण्यास उशीर होतो. ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’चे यूरोलॉजिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वीरू काशीविश्वनाथन म्हणतात, ‘मूत्राशयाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. जर त्याच्या निदानात विलंब झाला, तर त्याचा उपचारांच्या परिणामांवर आणि रुग्णाच्या जगण्याच्या शक्यतेवर थेट परिणाम होतो.’ ही लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, मूत्राशय भरलेले नसतानाही लघवीची भावना होणे, रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला उठावे लागणे.
हे निष्कर्ष प्राथमिक असून, तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या संशोधनात काही मर्यादाही आहेत. 1. अनेकदा रंगांधळेपणाचे निदानच झालेले नसते, त्यामुळे आकडेवारीत तफावत असू शकते. 2. रंगअंधत्वाचे अनेक प्रकार असतात (उदा. प्रोडानोपिया - लाल रंगाबाबत अंधत्व आणि ड्युटेरानोपिया - हिरव्या रंगाबाबत अंधत्व). या अभ्यासात कोणत्या प्रकारच्या रंगअंधत्वात जास्त धोका आहे, हे स्पष्ट झालेले नाही. जागतिक स्तरावर साधारणपणे 40 पैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे रंगअंधत्व असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.