

वॉशिंग्टन : एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? पृथ्वीबाहेरील दुसर्या ग्रहावरून कोणी आपल्याला पाहत आहे का? हे प्रश्न अजूनही वादग्रस्त आहेत. एलियन्सच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत; परंतु शास्त्रज्ञ याला नाकारत देखील नाहीत. त्यामुळे एलियन्सबाबत सातत्याने शोध घेतला जात आहे. आकाशात अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत, ज्या समजून घेणे किंवा समजावून सांगणे कठीण आहे. अनेकदा अशी अंतराळयानेही दिसली आहेत जी कोठून आली आणि कुठे गेली, याचा शोध घेता आला नाही. परग्रहवासीयांच्या अस्तित्वाविषयीची चर्चा संपुष्टात आणण्यासाठी अशा घटनांचा उलगडा पुरेसा नाही. कारण, या सर्व एलियन्सशी संबंधित घटना आहेत, हेही ते सिद्ध करत नाहीत. पण, लोकांचा या विषयातील रस सातत्याने वाढत आहे. जेणेकरून सरकारही या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे.
पेंटागॉनने जगभरातील विविध ठिकाणांशी संबंधित 757 प्रकरणांचा आढावा घेतला. 1 मे 2023 ते 1 जून 2024 या कालावधीत ही प्रकरणे अमेरिकन अधिकार्यांना कळविण्यात आली होती. यातील सर्वाधिक घटना हवाई हद्दीत, तर 49 घटना 100 किलोमीटर उंचीवर घडल्या आहेत. या उंचीला अवकाश म्हणतात. पाण्याखाली असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनांचे साक्षीदार असलेल्यांमध्ये व्यावसायिक आणि लष्करी वैमानिक, तसेच पृथ्वीवरून पाहणार्या काही लोकांचा समावेश होता. लोकांचा आणि शास्त्रज्ञांचा कुतूहल भागवण्यासाठी याचा हेतू सांगितला जात नाही. यूएफए किंवा यूपीएचा विचार केला तर राष्ट्रीय सुरक्षा आणि हवाई सुरक्षेच्या द़ृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरते. कारण, आकाशात एखादी अनोळखी घटना दिसल्याने राष्ट्रीय असुरक्षितताही निर्माण होते. त्याचवेळी, ऑल डोमेन अॅनोमली रिझोल्यूशन ऑफिसने म्हटले आहे की, त्यांनी आतापर्यंत शोधलेल्या कोणत्याही प्रकरणात पृथ्वीच्या बाहेरील कोणतेही संकेत आढळले नाहीत.