हवामान बदलामुळे पृथ्वीचे भौगोलिक ध्रुव सरकणार

हवामान बदलामुळे पृथ्वीचे भौगोलिक ध्रुव सरकणार
File Photo
Published on
Updated on

झुरिच : हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्याने येत्या काही वर्षांत पृथ्वीचे भौगोलिक ध्रुव हलण्याची शक्यता असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, बर्फाच्छादित प्रदेश वितळल्यामुळे आणि महासागरातील पाण्याचे प्रमाण जगभरात पुन्हा वितरित झाल्यामुळे, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या स्थानात 2100 सालापर्यंत सुमारे 89 फूट (27 मीटर) पर्यंत बदल होऊ शकतो. पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षात होणार्‍या या बदलामुळे उपग्रह व अंतराळयानांच्या दिशादर्शक प्रणालींवर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

पृथ्वी फिरताना तिच्या वस्तुमानाच्या वितरणात होणार्‍या बदलांमुळे ती आपल्या अक्षाभोवती गरगर फिरणार्‍या भांड्यासारखी डळमळते. या हालचालींपैकी बर्‍याचशा नियमित आणि पूर्वानुमान करता येण्यासारख्या असतात. काही हवामानातील दाब बदलांमुळे, काही महासागर प्रवाहांमुळे, तर काही पृथ्वीच्या कोअर आणि आवरणातील परस्परसंवादामुळे होतात. अलीकडील अभ्यासांनी सुचवले आहे की, बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या वस्तुमान वितरणातील बदलामुळेही पृथ्वीचे ध्रुव हलू शकतात. ‘ईटीएच’ झुरिचमधील संशोधकांनी 1900 ते 2018 या कालावधीतील ध्रुवांच्या हालचालींचा अभ्यास करून आणि भविष्यातील बर्फ वितळण्याचे विविध अनुमान लक्षात घेऊन, हवामान बदलाच्या विविध परिस्थितींनुसार ध्रुव किती हलू शकतील, याचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात गंभीर ग्रीनहाऊस वायू उत्सर्जनाच्या परिस्थितीत उत्तर ध्रुव पश्चिम दिशेने 2100 पर्यंत 89 फुटांहून अधिक हलू शकतो, असे निष्कर्ष अभ्यासकांनी नोंदवले. तुलनेत जर उत्सर्जन कमी ठेवण्यात आले, तरीही उत्तर ध्रुवाचे स्थान 1900 च्या तुलनेत सुमारे 39 फूट (12 मीटर) पर्यंत बदलू शकते. या हालचालींमध्ये ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक खंडातील बर्फ वितळण्याचा सर्वात मोठा वाटा असल्याचे आढळून आले, त्यानंतर हिमनद्यांच्या वितळण्याचा क्रम लागतो.

अभ्यासाचे सहलेखक आणि सध्या व्हिएन्ना विद्यापीठात कार्यरत असलेले पृथ्वीशास्त्रज्ञ मोस्तफा कियानी शाहवंदी यांनी सांगितले, ‘हा परिणाम हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीच्या उचलाचा प्रभाव म्हणजे ‘ग्लेशियल आयसोस्टॅटिक अ‍ॅडजस्टमेंट’ यापेक्षाही अधिक ठरतो.’ त्यांच्या म्हणण्यानुसार, बर्फयुगाच्या वेळी जड हिमनद्या आणि बर्फाच्या थरामुळे जमिनी खाली बसली होती आणि ते वितळल्यानंतर जमिनीने वर उठण्यास सुरुवात केली. त्यामुळे वस्तुमानाच्या वितरणात बदल झाला आणि ध्रुव हलले. ‘म्हणजेच, मानवनिर्मित हवामान बदलामुळे होणार्‍या ध्रुवांच्या हालचाली या नैसर्गिक हिमयुगातील बदलांपेक्षाही जास्त आहेत,’ असे कियानी शाहवंदी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news