

लंडन : लंडनमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात पडलेल्या तीव्र उष्णतेमुळे केवळ नागरिकच होरपळून निघाले नाहीत, तर शहराच्या इमारतींवरही याचे धक्कादायक परिणाम दिसू लागले आहेत. अनेक घरांच्या भिंतींना अचानक नागमोडी तडे जाणे, दरवाजे घट्ट अडकणे आणि खिडक्या वाकड्या होणे अशा समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे लंडनची जमीन आकसून घरे खचत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लंडन आणि आग्नेय इंग्लंडमधील बहुतांश भाग चिकणमातीवर वसलेला आहे. पावसाळ्यात स्पंजप्रमाणे पाणी शोषून घेणारी ही माती तीव्र उन्हाळ्यात कोरडी पडून मोठ्या प्रमाणावर आकसते. ब्रिटिश जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या 'श्रिंक-स्वेल' प्रक्रियेमुळे घरांचा पाया असंतुलित होऊन इमारती खाली खचू लागतात. तीव्र उष्णतेमुळे झाडांची मुळे पाण्याच्या शोधात घरांच्या पायाखालची ओल शोषून घेत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे.
जुनी बांधकामे सर्वाधिक धोक्यात
लंडनमधील ५० टक्क्यांहून अधिक घरे १९४५ पूर्वीची आहेत. या जुन्या वास्तूंचे पाया उथळ असल्याने त्यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. केंसिंग्टन, सिटी ऑफ लंडन आणि वेस्टमिन्स्टरसारख्या मध्यवर्ती भागांतील सर्वच मालमत्तांवर २०३० पर्यंत याचा मोठा धोका संभवतो, असा अंदाज विमा कंपन्यांनी वर्तवला आहे.
विमा कंपन्यांवर कोट्यवधींचा भार
असोसिएशन ऑफ ब्रिटिश इन्शुरर्सच्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे घरांच्या नुकसानीचे दावे प्रचंड वाढले आहेत. २०२५ मध्ये विमा कंपन्यांनी यासाठी विक्रमी $४१५ दशलक्ष दिले होते, तर २०२६ मध्ये हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विम्याचे हप्ते गगनाला भिडल्याने आणि भविष्यात संरक्षण मिळणे कठीण होणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत. काँक्रिट भरून पाया मजबूत करणे हा यावर अत्यंत खर्चिक उपाय मानला जातो. पूर किंवा वणव्याप्रमाणे हे संकट लगेच डोळ्यांना दिसत नसले, तरी घरांचे मूल्य कमी करणारे आणि कोट्यवधींचे आर्थिक नुकसान पोहोचवणारे हे हवामान बदलाचे नवे आणि गंभीर संकट ठरत आहे.