

व्हिएन्ना : अलीकडे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी ढगफुटीसद़ृश पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे कारण शोधण्याचाही संशोधकांकडून प्रयत्न होत आहे. ऑस्ट्रियातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या हवामान शास्त्रज्ञ कॅरोलिन म्युलर यांच्यासाठी ढग म्हणजे आकाशात वाहणारे द्रव पदार्थ आहेत. हवा कशी वर-खाली जाते, ती गरम किंवा थंड कशी होते आणि त्यातून चक्रीवादळ कसे निर्माण होते, याचा त्या सखोल अभ्यास करत आहेत. म्युलर यांच्या संशोधनाला अलीकडच्या काही वर्षांत प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे वादळे आता अधिक भयानक रूप धारण करत आहेत. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा दोन ते तीन पटीने जास्त पाऊस पडत आहे.
मार्च 2025 मध्ये अर्जेंटिनातील बाहिया ब्लांका शहरात अवघ्या 12 तासांत शहराच्या सरासरी वार्षकि पर्जन्यमानापैकी अर्धा पाऊस पडला. या ढगफुटीसद़ृश पावसाने तिथे भीषण पूर आला आणि जीवितहानी झाली. हवामान शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून संगणक मॉडेल्सचा वापर करून वादळांचा मागोवा घेत आहेत; मात्र जुन्या सिद्धांतांच्या आधारे या नव्या आणि तीव- वादळांचे स्पष्टीकरण देणे कठीण जात आहे. साधारण 200 वर्षांपूर्वीच्या एका सिद्धांतानुसार, हवा जेवढी गरम असेल, तेवढी ती जास्त आर्द्रता धरून ठेवू शकते.
प्रत्येक 1 अंश सेल्सिअस तापमान वाढीमागे हवेतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता 7 टक्क्यांनी वाढते. मात्र, सध्याच्या निरीक्षणानुसार पावसाचे प्रमाण या 7 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त वाढत आहे. म्युलर यांच्या मते, जेव्हा उष्णतेच्या लाटेनंतर लगेचच तीव- वादळ येते किंवा आधीच ओल्या असलेल्या जमिनीवर असा प्रचंड पाऊस पडतो, तेव्हा त्याचे रूपांतर भीषण पुरात होते. हवा गरम झाल्यामुळे ढगांमधील ऊर्जेचे स्वरूप बदलत असून ते आता अधिक ‘स्फोटक’ होत आहेत, ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस कोसळत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ढग ज्या पद्धतीने एकत्र येतात किंवा त्यांचे समूह तयार होतात, त्यातूनच पावसाच्या वाढत्या तीव-तेचे रहस्य उलगडू शकते.
कॅरोलिन म्युलर यांनी दशकभरापूर्वी सुरू केलेल्या संशोधनातून अशा काही सूक्ष्म प्रक्रिया समोर आल्या आहेत, ज्याकडे जुन्या हवामान मॉडेल्सनी दुर्लक्ष केले होते. या प्रक्रिया ढग कसे बनतात, ते कसे एकत्र येतात आणि किती काळ टिकून राहतात यावर परिणाम करतात. म्युलर यांच्या मते, ढगांचे एक स्वतःचे ‘अंतर्गत जीवन’ असते. काही विशिष्ट प्रक्रिया ढगांना अधिक शक्तिशाली बनवतात किंवा त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे पावसाचा जोर कित्येक पटीने वाढतो. अनेक शास्त्रज्ञांना यावर विश्वास ठेवण्यासाठी अधिक ठोस पुराव्यांची गरज आहे. या संशोधनामुळे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्याच्या क्षमतेत मोठी सुधारणा होईल, अशी संशोधकांना आशा आहे. विशेषतः, उष्णकटिबंधीय प्रदेशांत, जिथे सर्वात भीषण वादळे धडकतात आणि जिथे पावसाच्या भविष्यातील अंदाजांबाबत आजही मोठी अनिश्चितता आहे, तिथे हे संशोधन मैलाचा दगड ठरू शकते.