Sombrero Galaxy image | ‘सोम्बेरो’ आकाशगंगेचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट दर्शन

’डार्क एनर्जी कॅमेरा’ने टिपली दोन नवीन वैशिष्ट्ये
Sombrero Galaxy image |
Sombrero Galaxy image | ‘सोम्बेरो’ आकाशगंगेचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट दर्शन
Published on
Updated on

न्यूयॉर्क : अंतराळातील रहस्यमय ‘सोम्बेरो गॅलेक्सी’ (Sombrero Galaxy - M104) तिच्या विशिष्ट आकारामुळे नेहमीच खगोलप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मेक्सिकन टोपीसारख्या (सोम्बेरो) आकारामुळे ओळखल्या जाणार्‍या या आकाशगंगेचे एक नवीन आणि अत्यंत स्पष्ट छायाचित्र समोर आले आहे. ‘डार्क एनर्जी कॅमेरा’ने टिपलेल्या या छायाचित्रात सोम्बेरो आकाशगंगेची अशी दोन वैशिष्ट्ये उघड झाली आहेत, जी यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती.

या नवीन छायाचित्रात सोम्बेरो आकाशगंगेचा मधला फुगीर भाग आणि धुलिकणांचा गडद पट्टा कमालीच्या स्पष्टतेने दिसत आहे. या आकाशगंगेचे केंद्र अत्यंत तेजस्वी असून, त्याभोवती सुमारे 2,000 ‘ग्लोब्युलर क्लस्टर्स’ (प्राचीन तार्‍यांचे समूह) एखाद्या थव्यासारखे दिसत आहेत. विशेष म्हणजे, यातील धुळीची पट्टी पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि सलग दिसत आहे, ज्यामुळे या गॅलेक्सीला एखाद्या टोपीच्या काठासारखा आकार प्राप्त झाला आहे. याच भागात नवीन तार्‍यांचा जन्म होतो.

प्रथमच दिसलेली दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये : या प्रतिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात अशा काही गोष्टी टिपल्या गेल्या आहेत, ज्या अत्यंत पुसट असल्याने आतापर्यंत शोधणे कठीण होते : 1. प्रचंड मोठा प्रभामंडल (Diffuse Halo): दीर्घिकेच्या तेजस्वी चकतीभोवती एक विस्तीर्ण आणि धूसर प्रभामंडल पसरलेले दिसत आहे. हे मंडल मूळ आकाशगंगेच्या रुंदीपेक्षा तीन पटीने मोठे असून, यामुळे या आकाशगंगेचा आकार प्रत्यक्षात किती प्रचंड आहे, हे स्पष्ट होते. 2. तार्‍यांचा प्रवाह (Stellar Stream): आकाशगंगेच्या एका बाजूला तार्‍यांचा एक पुसट आणि वक्राकार प्रवाह दिसत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रवाह म्हणजे सोम्बेरो आकाशगंगेने भूतकाळात एखादा लहान उपग्रह आकाशगंगेला स्वतःमध्ये सामावून घेतल्याचा (किंवा त्यांच्यातील संघर्षाचा) पुरावा आहे.

या वैशिष्ट्यामुळे सोम्बेरोची परिपूर्ण सममिती भंग पावलेली दिसते. हे विस्मयकारक छायाचित्र चिली येथील ‘सेरो टोलोलो इंटर-अमेरिकन ऑब्झर्व्हेटरी’मधील व्हिक्टर एम. ब्लँको टेलिस्कोपवर बसवलेल्या 570-मेगापिक्सेल क्षमतेच्या ‘डार्क एनर्जी कॅमेरा’द्वारे घेण्यात आले आहे. हा कॅमेरा अत्यंत पुसट प्रकाश शोधण्यासाठी डिझाईन केला आहे, ज्यामुळे आकाशगंगेचा तेजस्वी गाभा आणि तिचे अंधुक बाह्य भाग एकाच प्रतिमेत स्पष्टपणे टिपणे शक्य झाले. 2024 आणि जून 2025 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या निरीक्षणांनंतर, या नवीन छायाचित्राने सोम्बेरो आकाशगंगेच्या अभ्यासात मोलाची भर घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news