

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठ्या सौर दुर्बिणीने सूर्यावर झालेल्या एका प्रचंड विस्फोटाची, म्हणजेच सौर ज्वालांची आतापर्यंतची सर्वात स्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत. ही छायाचित्रे केवळ थक्क करणारी नाहीत, तर ती सौर वादळांमागील गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
हवाई बेटांवर असलेल्या ‘डॅनियल के. इनूये सोलार टेलिस्कोप’ या जगातील सर्वात मोठ्या सौर दुर्बिणीने 8 ऑगस्ट 2024 रोजी एका शक्तिशाली ‘एक्स-क्लास’ (X-class) सौर ज्वालांच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित केले. यातून सूर्याच्या पृष्ठभागावरील प्लाझ्माच्या अस्ताव्यस्त वेटोळ्यांची अतिशय तपशीलवार छायाचित्रे मिळाली आहेत. या निरीक्षणांमुळे शास्त्रांना सौर ज्वालांमागील प्रक्रिया समजून घेण्यास आणि भविष्यातील वादळांचा अचूक अंदाज वर्तवण्यात मदत होऊ शकते. या अभ्यासाचे सहलेखक आणि कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील सौर भौतिकशास्त्रज्ञ कोल तांबुरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘इनूये सोलार टेलिस्कोपद्वारे एक्स-क्लास ज्वालांचे निरीक्षण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ज्वाला आपल्या तार्याने (सूर्याने) निर्माण केलेल्या सर्वात ऊर्जावान घटनांपैकी एक आहेत आणि सुदैवाने, आम्ही ही घटना अगदी योग्य परिस्थितीत टिपू शकलो.’
सौर ज्वाला म्हणजे सौर वादळांच्या वेळी सूर्याकडून उत्सर्जित होणारा प्रकाशाचा प्रचंड मोठा स्फोट. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रांमध्ये पीळ पडल्याने प्लाझ्माचे मोठे, गुंफलेले वेटोळे तयार होतात, ज्यांना ‘आर्केडस्’ म्हणतात. हे वेटोळे सूर्याच्या सर्वात बाहेरील आणि उष्ण थरात, म्हणजेच ‘कोरोना’मध्ये पसरतात. जेव्हा हे चुंबकीय क्षेत्र इतके गुंतागुंतीचे होते की, ते अचानक तुटून पुन्हा मूळ स्थितीत येते (या प्रक्रियेला ‘मॅग्नेटिक रिकनेक्शन’ म्हणतात), तेव्हा सूर्य प्रचंड ऊर्जा आणि कण सौर ज्वालांच्या रूपात अवकाशात फेकतो. ही ऊर्जा पृथ्वीच्या दिशेने आल्यास, ती रेडिओ कम्युनिकेशन आणि पृथ्वीभोवती फिरणार्या उपग्रहांना बाधित करू शकते.
शास्त्रज्ञांना आतापर्यंत या प्लाझ्मा वेटोळ्यांचा नेमका आकार माहीत नव्हता; कारण जुन्या दुर्बिणींची क्षमता मर्यादित होती. मात्र, ‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये 25 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासात, तांबुरी आणि त्यांच्या सहकार्यांनी इनूये दुर्बिणीच्या ‘व्हिजिबल ब्राॅडबँड इमेजर’ उपकरणाचा वापर करून या प्लाझ्मा वेटोळ्यांची उच्च-रिझोल्यूशन छायाचित्रे मिळवली. या अभ्यासात असे दिसून आले की, प्लाझ्माच्या वेटोळ्यांची सरासरी रुंदी सुमारे 30 मैल (48 किलोमीटर) होती. तर काही वेटोळी त्याहूनही लहान, म्हणजे सुमारे 13 मैल (21 किलोमीटर) रुंदीची होती, जी या दुर्बिणीची पाहण्याची किमान क्षमता आहे. या अभूतपूर्व यशामुळे खगोलशास्त्रज्ञांना सूर्याच्या कार्यप्रणालीचा अधिक जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे.