

लंडन : जगभरातील प्लास्टिक कचर्याची समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी मार्ग शोधून काढला आहे. सौरऊर्जा आणि जुन्या कार बॅटरीमधील अॅसिडचा वापर करून टाकाऊ प्लास्टिकचे रूपांतर आता ‘स्वच्छ हायड्रोजन’ इंधनात करणे शक्य झाले आहे.
संशोधकांच्या मते, ही एक ‘वन-पॉट’ प्रक्रिया आहे. यामध्ये रिसायकल करण्यास कठीण असलेल्या प्लास्टिकचे रूपांतर मौल्यवान औद्योगिक रसायने आणि स्वच्छ इंधनात केले जाते. यामुळे एकाच वेळी अनेक प्रकारच्या कचर्याची विल्हेवाट लावणारी एक ‘सर्क्युलर अपसायकलिंग’ यंत्रणा निर्माण होऊ शकते. 2025 मध्ये जगभरात 40 कोटी मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला. परंतु, त्यापैकी 10 टक्क्यांहून कमी प्लास्टिक प्रत्यक्षात रिसायकल केले गेले. प्लास्टिकचे अनेक प्रकार असल्याने त्यांच्या विल्हेवाटीत मोठे अडथळे येतात. सोपे रिसायकलिंग : पॉलिप्रोपिलिन आणि पॉलिथिन यांसारखे प्लास्टिक वितळवून पुन्हा वापरता येते. कठीण रिसायकलिंग : PET (खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग), PU (फोम, गाद्या) आणि नायलॉन यांसारख्या प्लास्टिकला रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यांच्या मूळ घटकांमध्ये (मोनोमर्स) विभागावे लागते.
या नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी केवळ प्लास्टिकचे मूळ घटक मिळवले नाहीत, तर त्यांचे ‘अपसायकलिंग’ करून नवीन मौल्यवान उत्पादने तयार केली आहेत. त्यांनी प्लास्टिकचे विघटन आणि हायड्रोजन निर्मिती या दोन्ही प्रक्रिया एकाच रिअॅक्टरमध्ये यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी या दोन्ही प्रक्रियांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला होता. परंतु, त्या एकत्रितपणे साध्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘जुल’ या प्रसिद्ध नियतकालिकात 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी प्रथम ‘डिपॉलिझेशन’ (depolymerization - रेणूंचे विघटन) प्रक्रियेपासून सुरुवात केली.
‘पेट’ (PET) प्लास्टिकवर लक्ष केंद्रित करत त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचे बारीक पावडरमध्ये रूपांतर केले आणि ती पावडर तीव— सल्फ्यूरिक अॅसिडमध्ये विरघळली. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक के क्वार्टेंग यांनी सांगितले की, ‘आम्ही हे मिश्रण 140 अंश सेल्सियसपर्यंत गरम करतो, ज्यामुळे प्लास्टिकचे जलविघटन (hydrolysis) होऊन त्याचे पुन्हा मूळ घटकांमध्ये (monomers) रूपांतर होते.’ त्यांनी पुढे माहिती दिली की, ‘PET प्लास्टिकच्या बाबतीत हे घटक म्हणजे ‘इथिलिन ग्लायकोल’ आणि ‘टेरेफ्थालिक अॅसिड’ आहेत, जे दोन्ही अत्यंत मौल्यवान औद्योगिक रसायने आहेत.’