

लंडन : पोलंडमध्ये पुन्हा एकदा रहस्यमयी नाझी ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ही हिटलरची गुप्त ट्रेन असल्याचे म्हटले जाते. ही ट्रेन खजिन्याने भरलेली होती. ही ट्रेन 1945 मध्ये हंगेरीहून जर्मनीला जात असताना गायब झाल्याचे म्हटले जाते. ट्रेन पुस्तके, रत्ने आणि इतर मौल्यवान वस्तूंनी भरलेली होती. या ट्रेनमध्ये भरलेल्या खजिन्याची अंदाजे किंमत 200 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.
यापूर्वीदेखील अनेकदा ही बेपत्ता नाझी ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसर्या महायुद्धापासून या ट्रेनचा शोध सुरू आहे. आता एका पोलिश तज्ज्ञाने दावा केला आहे की, ही बेपत्ता ट्रेन देशातील डिझिमियानी भागात सापडली आहे. ही ट्रेन समोर आणण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, पोलिश अधिकार्यांनी रहस्यमय नाझी ट्रेन शोधण्यासाठी उत्खननासाठी अधिकृतपणे परवानगी दिली आहे.
खजिन्याचा शोध जॅन डेलिंगोव्स्की यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. असे मानले जाते की, या ट्रेनमध्ये अंबर रूमसारख्या दुर्मीळ वस्तूदेखील असू शकतात. हिटलरच्या सोन्याने भरलेल्या ट्रेनचे गूढ दुसर्या महायुद्धात नाझी सैन्याने केलेल्या लुटीशी संबंधित आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, जेव्हा नाझी जर्मनी पराभवाकडे वाटचाल करत होता, तेव्हा हिटलरने त्याच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात लुटलेले सोने, दागिने आणि मौल्यवान वस्तू एका ट्रेनमध्ये भरून त्या एका गुप्त ठिकाणी लपवण्याचा आदेश दिला. नैऋत्य पोलंडच्या वॉलब्रझिच प्रदेशातील बोगद्यात किंवा पर्वतीय बंकरमध्ये ही ट्रेन लपलेली असू शकते. त्यात सुमारे 250 दशलक्ष पौंड (सुमारे 1.5 अब्ज भारतीय रुपये) किमतीचा खजिना आहे.
दुसर्या महायुद्धापासून या ट्रेनचा शोध सुरू आहे. यापूर्वी 2016 मध्ये पोलंडमध्येही उत्खनन करण्यात आले होते. परंतु, त्याबद्दल कोणतेही ठोस पुरावे सापडले नव्हते. या महिन्यात पोलंडच्या डिझिमियानी प्रदेशात एका प्राचीन बंकरच्या शोधामुळे पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत. येथे संशोधक या ट्रेनचा आणि खजिन्याचा शोध घेत आहेत. मात्र, आतापर्यंत या ट्रेनबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. अनेक तज्ज्ञ या ट्रेनला केवळ कथांचा एक भाग मानतात. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर नाझी लुटीतील फक्त 70 टक्के वस्तू सापडल्या आहेत. उर्वरित 30 टक्के वस्तू अजूनही गहाळ असू शकतात, ज्यामुळे गूढ आणखी वाढले आहे.