

वॉशिंग्टन : अवकाश संशोधनातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2032 मध्ये चंद्राला धडकण्याची शक्यता असलेल्या ‘2024 वायआर 4’ नावाच्या महाकाय लघुग्रहाचा धोका आता पूर्णपणे टळला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या ताज्या निरीक्षणांनंतर शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की, हा लघुग्रह चंद्राला धडकण्याची शक्यता आता शून्य टक्के आहे.
18 आणि 26 फेब्रुवारी रोजी जेम्स वेब टेलिस्कोपच्या अतिसंवेदनशील इन्फ्रारेड उपकरणांद्वारे या लघुग्रहाचा मागोवा घेण्यात आला. यापूर्वी या लघुग्रहाची चंद्राशी टक्कर होण्याची शक्यता 4.3 टक्के वर्तवण्यात आली होती. मात्र, नव्या आकडेवारीनुसार या अवकाशीय खडकाचा मार्ग बदलल्याचे स्पष्ट झाले असून तो आता सुरक्षित अंतरावरून जाणार आहे. ‘नासा’ने 5 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, हा लघुग्रह चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 21,200 किलोमीटर (13,200 मैल) अंतरावरून जाईल. हे अंतर काही कृत्रिम उपग्रहांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेपेक्षाही कमी आहे.
सहा वर्षांनंतर जेव्हा हा लघुग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल, तेव्हा तो लाखो मैल अंतरावरून जाईल, ज्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नसेल. 2024 च्या शेवटी ‘अॅटलास’ नेटवर्कद्वारे शोधण्यात आलेला हा लघुग्रह साधारण 174 ते 220 फूट (53 ते 67 मीटर) व्यासाचा आहे. याची तुलना इटलीच्या ‘लिनिंग टॉवर ऑफ पिसा’च्या उंचीशी केली जाऊ शकते. जर या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला, तर तो हिरोशिमावर टाकलेल्या 500 अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण करू शकतो. यामुळे एखादे संपूर्ण शहर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असल्याने याला ‘सिटी-किलर’ असे नाव देण्यात आले आहे.
‘नासा’च्या मते, 2025 च्या वसंत ऋतूपासून हा लघुग्रह पृथ्वीवरून किंवा इतर कोणत्याही दुर्बिणीतून दिसणे अशक्य होते. केवळ जेम्स वेब टेलिस्कोपच्या प्रचंड क्षमतेमुळेच त्याचे इतके अचूक निरीक्षण करणे शक्य झाले आहे. सुरुवातीला या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता 3.1 टक्के इतकी उच्च वर्तवण्यात आली होती, जी आजवरच्या कोणत्याही लघुग्रहासाठी सर्वाधिक होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत जेम्स वेब आणि इतर दुर्बिणींकडून मिळालेल्या माहितीमुळे पृथ्वीवरील धोका आधीच टळला होता. आता चंद्रावरील धडकेचा 4.3 टक्के धोकाही संपुष्टात आला असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.