Chronic Fatigue Syndrome | ‘क्रॉनिक फटीग सिंड्रोम’च्या रहस्याचा उलगडा?

संशोधनात सापडले महत्त्वाचे आनुवंशिक धागेदोरे
chronic-fatigue-syndrome-mystery-solved
Chronic Fatigue Syndrome | ‘क्रॉनिक फटीग सिंड्रोम’च्या रहस्याचा उलगडा?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : एका मोठ्या वैज्ञानिक संशोधनात, मायल्जिक एन्सेफॅलोमायलायटिस/क्रॉनिक फटीग सिंड्रोम (ME/CFS) या गुंतागुंतीच्या आणि रुग्णांना दुर्बळ करणार्‍या आजाराच्या आनुवंशिक मुळांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या आनुवंशिक विश्लेषणामध्ये, संशोधकांना या आजाराशी संबंधित जनुकीय आराखड्यातील आठ नवीन भाग सापडले आहेत. या शोधामुळे ME/CFS हा केवळ एक मानसिक आजार असल्याच्या जुन्या आणि नाकारलेल्या सिद्धांतांना छेद मिळाला असून, तो एक जैविक आजार असल्याच्या दाव्याला भक्कम पुरावा मिळाला आहे.

संशोधनातील प्रमुख निष्कर्ष

‘डिकोडएमई’ (DecodeME) नावाच्या या अभ्यासात युरोपीय वंशाच्या 15,000 हून अधिक ME/CFS रुग्णांच्या जनुकीय माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत :

नवीन आनुवंशिक दुवे

संशोधकांना मानवी जनुकीय आराखड्यातील आठ असे विशिष्ट भाग आढळले, ज्यांचा संबंध थेट ME/CFS शी आहे. यापूर्वी या भागांचा आजाराशी संबंध जोडला गेला नव्हता.

आनुवंशिकता आणि पर्यावरण

विशेष म्हणजे, या जनुकीय भागांमध्ये आढळणारे बदल काही निरोगी व्यक्तींमध्येही आढळून येतात. मात्र, संशोधकांच्या मते, ME/CFS असलेल्या रुग्णांमध्ये हे जनुकीय बदल आणि काही पर्यावरणीय घटक एकत्र आल्याने आजार होण्याचा धोका वाढतो.

पहिला ठोस पुरावा

एडिनबर्ग विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिशियन आणि या अभ्यासाचे सहलेखक ख्रिस पॉन्टिंग यांनी सांगितले की, ‘चए च्या धोक्यामागे आनुवंशिक कारणे असल्याचे हे पहिले ठोस पुरावे आहेत. ‘हे संशोधन सध्या एडिनबर्ग विद्यापीठाने प्रसिद्धीपूर्व स्वरूपात प्रसिद्ध केले आहे.

आजारामागील संघर्ष आणि गैरसमज

ME/CFS हा एक असा आजार आहे, जो रुग्णाच्या शारीरिक हालचाल करण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम करतो आणि आयुष्यभरासाठी दुर्बळ बनवू शकतो. जगभरात सुमारे 6.7 कोटी लोकांना हा आजार असावा, असा अंदाज आहे; परंतु यावरील संशोधन अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे, अनेक वर्षांपासून या आजाराला ‘मानसिक’ आजार म्हणून पाहिले जात होते. काही मानसोपचार तज्ज्ञांनी असे चुकीचे सिद्धांत मांडले होते की, हा आजार रुग्णांच्या मानसिक स्थितीमुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे होतो. ‘ब्रेन फॉग’ (विचारांमध्ये गोंधळ), विश्रांती घेऊनही न जाणवणारा थकवा आणि तीव्र वेदना यासारखी लक्षणे मानसिक असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सिद्धांतांना कोणताही जैविक आधार सापडला नव्हता, ज्यामुळे रुग्णांना अनेक वर्षे सामाजिक आणि वैद्यकीय अवहेलना सहन करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news