Christmas Special | नाताळचा प्रेमसंदेश

Christmas Special
Christmas Special | नाताळचा प्रेमसंदेशFile photo
Published on
Updated on

विनायक सरदेसाई

सुमारे दोन हजार वर्षांची परंपरा असलेला हा सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ‘ख्राईस्ट मास’ अर्थात ख्रिस्त जन्मानिमित्त केली जाणारी सामूहिक प्रार्थना म्हणजेच ख्रिसमस होय.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा नाताळ आणि त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ईस्टर हे दोन ख्रिश्चन धर्मियांचे महत्त्वाचे सण होत. नाताळ हा प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. संत युहान्ना यांनी लिहिले आहे, ‘परमेश्वराने जगावर एवढे प्रेम केले की, आपला लाडका पुत्र जगाला दिला.’ नाताळ हा ईश्वराचे अनंत प्रेम, आनंद आणि उद्धाराची साक्ष देणारा आनंदसोहळा आहे. दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तेव्हापासून तो साजरा केला जात आहे. भारताच्या काही भागांत ख्रिस्ती समुदाय पहिल्या शतकापासून अस्तित्वात आहे. चेन्नईनजीक मइलापूर शहरात येशूच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे संत थॉमस यांची कबर आहे आणि आजही अनेक यात्रेकरू तिच्या दर्शनासाठी जगभरातून येतात.

ईश्वराचा प्रेषित असणार्‍या येशूने क्रूसावर प्राण त्यागून ईश्वराचे असीम प्रेम प्रकट केले. या प्रेमाने प्रेरित होऊन लाखो लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि येशूच्या प्रेमाचा आणि शुभवार्तेचा संदेश प्रसृत करणे हेच आपले जीवितकार्य मानले. त्यासाठी प्रसंगी बलिदानही दिले. ख्रिस्तपूर्व रोमन साम्राज्यात 25 डिसेंबरला सूर्यदेवाच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. तोच दिवस ‘ख्राईस्ट मास’ म्हणजे येशूच्या जन्मानिमित्त होणारी सामूहिक प्रार्थना म्हणून साजरा केला जातो. तोच ख्रिसमस किंवा नाताळ होय. 24 आणि 25 डिसेंबरच्या मधील रात्र म्हणजे ख्रिसमसचा अपूर्व सोहळा साजरा करण्याची रात्र. ख्रिसमस ट्री दिव्यांनी सजविले जातात. लोक एकमेकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा देतात. पूर्वी ख्रिसमस ट्री फक्त जर्मनीत होते.

आता ते जगभर दिसतात. ख्रिसमसवेळी कॅरोल्सचा समावेश सर्वप्रथम ब्रिटनमध्ये झाला, तर आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली, असे मानले जाते. ख्रिसमस कार्ड 1846 मध्ये प्रथम तयार केल्याचा उल्लेख आढळतो, तर 1868 मध्ये सांताक्लॉजचा उल्लेख सर्वप्रथम झाल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी लहान मुले आपला मोजा घराबाहेर अडकवून ठेवतात आणि सांताक्लॉज त्यात भेटवस्तू टाकून जातो, अशी ही परंपरा आहे. प्रेमाची देवाणघेवाण करण्याचा हा दिवस आहे. निगर्वी प्रेम कधीच नष्ट होत नाही, असा या सणाचा संदेश आहे. प्रेमाची भावना जोपासल्यास सर्व पूर्वग्रह नष्ट होतील आणि सर्व प्रकारची हिंसा, दहशत या जगातून संपुष्टात येईल, असा आशावाद जागविणारा ख्रिसमसचा हा सण असून, जो धर्म प्रेमभावना वृद्धिंगत करू शकत नाही, तो धर्मच नष्ट होईल, असेही हा सण आपल्याला सांगतो.

मानवजातीच्या उद्धारासाठी ईश्वराने केलेल्या कृपेची आठवण करून देण्याचा सण म्हणजे नाताळ. पाप वाढू दिल्यास ते ईश्वराच्या इच्छेविरुद्ध असेल. त्यामुळे चांगली कृत्ये करून परमेश्वराचे प्रेम मिळवा, असा संदेश नाताळ देतो. बायबलमध्ये त्यागाचा उल्लेख अनेकदा आढळतो. देहत्यागाचाही त्यात समावेश आहे. रक्त अर्पण केल्याशिवाय उद्धार होत नाही. त्यामुळेच येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राणत्याग केला आणि जगाचा उद्धार केला. सर्वांना परस्पर प्रेमाने जोडणारे जीवन मनुष्याला प्रदान करण्यासाठीच येशूचा जन्म झाला. परमेश्वराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जग सोडून जाणे गरजेचे नाही.

संसारातील आपली कर्तव्ये पार पाडून, एकमेकांशी साहचर्य राखून, प्रेमाने व्यवहार करून परमेश्वराच्या जवळ जाता येते, असा संदेश देणारा ख्रिसमसचा सण आहे. बायबलमध्ये येशूला ‘उत्तम मेंढपाळ’ असे संबोधले गेले आहे. चांगला मेंढपाळ मेंढ्यांच्या सर्व गरजांचा विचार करून त्यांची काळजी घेण्यात तत्पर असतो. येशूनेही मानव कल्याणाचा वसा घेऊन सर्वांच्या गरजा जाणल्या आणि परस्पर साहचर्य, प्रेमाचा संदेश देऊन प्रेमाने व्यवहार करण्याची ऊर्जा दिली. त्यामुळेच त्याचा जन्मदिवस हा प्रेमसोहळा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news