

हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमुख कारण म्हणजे, धमन्यांमध्ये साचलेले खराब कोलेस्टेरॉल (LDL). खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही फळे खूप प्रभावी ठरू शकतात. या फळांमध्ये अँटिऑक्सिडंटस्, फायबर आणि इतर पोषक तत्त्वे असतात, जी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास आणि धमनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊ अशी कोणती फळे आहेत, जी तुमच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही हृदयाचे आरोग्य सुधारू शकता.
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. याशिवाय, सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात जे धमन्यांमधील जळजळ कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. रोज एक सफरचंद खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदय निरोगी राहते.
कसे खावे : सफरचंद सलाडमध्ये, स्मुदीमध्ये किंवा थेट कच्चे खाऊ शकता. सालीसह खाणे अधिक फायदेशीर आहे. कारण, सालीत जास्त फायबर आणि अँटिऑक्सिडंटस् असतात.
द्राक्षांमध्ये रेस्वेराट्रॉल आणि फ्लाव्होनॉईडस्सारखे अँटिऑक्सिडंटस् असतात, जे खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि धमन्यांमधील अडथळे दूर करतात. द्राक्षे रक्तप्रवाह सुधारतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. लाल आणि काळी द्राक्षे विशेषतः प्रभावी असतात.
कसे खावे : द्राक्षे ताजी खाऊ शकता, सलाडमध्ये मिसळू शकता किंवा त्यांचा रस पिऊ शकता. मात्र, रसात साखरेचे प्रमाण जास्त नसावे याची काळजी घ्या.
स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या बेरींमध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि धमन्यांमधील प्लाक तयार होण्यास प्रतिबंध होतो. बेरी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही उत्तम आहेत.
कसे खावे : बेरी स्मुदी, दही किंवा ओटस्सोबत खाऊ शकता. ताज्या किंवा गोठवलेल्या बेरी दोन्ही फायदेशीर आहेत.
संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यातील हेस्पेरिडिन नावाचे अँटिऑक्सिडंट धमन्यांचे आरोग्य सुधारते आणि रक्तप्रवाह वाढवते.
कसे खावे : संत्र थेट खाऊ शकता, त्याचा रस पिऊ शकता किंवा सलाडमध्ये समाविष्ट करू शकता.
एव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅटस् (मोनोअनसॅच्युरेटेड फॅटस्) आणि फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि धमनी स्वच्छ राहतात.
कसे खावे : एव्होकॅडो सलाड, स्मुदी किंवा टोस्टवर लावून खाऊ शकता.
डाळिंबामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् असतात, जे धमन्यांमधील प्लाक कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. डाळिंबाचा रस नियमित प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि हृदय निरोगी राहते.
कसे खावे : डाळिंबाचे दाणे सलाडमध्ये टाकू शकता किंवा त्याचा ताजा रस बनवून पिऊ शकता.