

दुबई : ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही आता केवळ कवीकल्पना राहिलेली नाही. सध्याच्या काळात चॉकलेटपासून अनेक भव्य आणि सुंदर कलाकृतीही बनवल्या जात आहेत. त्यामध्ये अशा चॉकलेटच्या बंगल्याचाही समावेश असतो. अशा अनेक खाद्यकलाकृतींची माहिती लोकांना सोशल मीडियाच्या मार्गाने मिळत असते. आता असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी चॉकलेटपासून चक्क विमान आणि एअरपोर्ट तयार करत आहे.
या तरुणीने चॉकलेट केकपासून सुंदर असं एक विमान तयार केलं आणि मग विमानाची धावपट्टी. सोबतच एअरपोर्ट देखील तयार केले. ही सुंदर कलाकृती पाहून अनेक लोक थक्क झाले. हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत 5 कोटींपेक्षा अधिक नेटकर्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर या कलाकृतीचं कौतुक केलं आहे. पण हे विमान दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच ते बनवायला कठीण सुद्धा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. या तरुणीनं आधी केकपासून विमानाचा आकार तयार करून घेतला. मग त्यावर चॉकलेटची लेअर लावून फिनिशिंग केलं. मग चॉकलेट सुकल्यानंतर त्यावर पांढर्या रंगाच्या चॉकलेटची लेअर लावली, जेणेकरून विमान खरंखुरं वाटावं. पुढे विविध प्रकारच्या इमारची, कंट्रोल टॉवर, धावपट्टी, एअरपोर्टची बिल्डिंग अशा विविध गोष्टी चॉकलेटपासून तयार केला आणि या अथक मेहनतीमधून शेवटी तयार झालं चॉकलेटचं एअरपोर्ट! या तरुणीने यापूर्वीही चॉकलेट व केकपासून वेगवेगळ्या वाहनांच्या सुबक प्रतिकृती बनवलेल्या आहेत.