

बीजिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सच्या जगात दररोज नवनवीन शोध लागत असताना, चीनने एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जग अचंबित झाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच, एका एआय रोबोला पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अधिकृत प्रवेश देण्यात आला आहे.
‘Xueba 01’ (श्युबा 01) नावाचा हा रोबो लवकरच आपला चार वर्षांचा डॉक्टरेट कार्यक्रम सुरू करणार असून, या घटनेने शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
‘Xueba 01’ या एआय रोबोची निवड ‘वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स’दरम्यान डॉक्टरेट करण्यासाठी करण्यात आली. हा रोबो पुढील चार वर्षांसाठी शांघाय थिएटर अॅकॅडमीमध्ये पीएच.डी. करणार आहे. या अनोख्या विद्यार्थ्याच्या निर्मितीमध्ये शांघाय युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ड्रॉईडअप रोबोटिक्स या कंपन्यांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, हा रोबो ‘चिनी ऑपेरा’ या गुंतागुंतीच्या विषयावर संशोधन करणार आहे. ‘Xueba 01’ हा एक ह्युमनॉईड रोबो असून, तो दिसायला हुबेहूब माणसासारखा आहे.
त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत : मानवी त्वचा : त्याची त्वचा सिलिकॉनपासून बनवण्यात आली आहे, ज्यामुळे ती खरी वाटते. चेहर्यावरील हावभाव : सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा रोबो माणसांप्रमाणेच चेहर्यावर विविध हावभाव दाखवू शकतो. वजन आणि उंची : या रोबोटचे वजन सुमारे 30 किलोग्रॅम आहे, तर त्याची उंची जवळपास 1.75 मीटर (सुमारे 5 फूट 9 इंच) आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात या रोबोचा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अधिकृतपणे प्रवेश निश्चित होईल. एका रोबोने पीएच.डी.साठी प्रवेश घेणे हे तंत्रज्ञानाच्या द़ृष्टीने एक मोठे यश मानले जात आहे. यामुळे संशोधन आणि विश्लेषणाच्या क्षेत्रात क्रांती घडू शकते, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, दुसरीकडे या घटनेमुळे लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मानवी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेची जागा भविष्यात मशिन घेतील का, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. ‘Xueba 01’ चे हे शैक्षणिक पाऊल मानव आणि मशिन यांच्यातील सहकार्याचे नवे पर्व सुरू करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.