water battery technology | चीनमधील संशोधकांनी बनवली 300 वर्षे टिकणारी ‘वॉटर बॅटरी’

water battery technology |
water battery technology | चीनमधील संशोधकांनी बनवली 300 वर्षे टिकणारी ‘वॉटर बॅटरी’
Published on
Updated on

बीजिंग : जगभरात शाश्वत ऊर्जेचा शोध सुरू असताना चीनमधील संशोधकांनी बॅटरी तंत्रज्ञानात एक मैलाचा दगड गाठला आहे. संशोधकांनी एका बिनविषारी ‘अ‍ॅक्युलस बॅटरी’ म्हणजेच वॉटर बॅटरीचे सूत्र विकसित केले आहे. ही बॅटरी सध्याच्या सर्वोत्तम उपकरणांपेक्षा 10 पटीने अधिक काळ टिकू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या बॅटरीचे आयुष्य केवळ मोठे नाही, तर ती पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. या बॅटरीची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत. दीर्घायुष्य : ही बॅटरी तब्बल 1,20,000 चार्ज सायकल्स पूर्ण करू शकते. ग्रीड स्टोरेजसाठी वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत हे आयुष्य 10 पटीने जास्त आहे. 300 वर्षांचा टिकाऊपणा : 2024 च्या आकडेवारीनुसार, ग्रीड बॅटरी दिवसातून सरासरी 1.1 वेळा चार्ज-डिस्चार्ज होतात. या वेगाने वापर केल्यास, ही नवीन बॅटरी बदलण्यापूर्वी सुमारे 300 वर्षे टिकू शकते.

पर्यावरणपूरक विल्हेवाट : या बॅटरीत वापरले जाणारे ‘इलेक्ट्रोलाईटस्’ इतके सुरक्षित आहेत की संशोधकांनी त्यांची तुलना ‘टोफू ब्राइन’ म्हणजेच सोया पनीरच्या पाण्याशी केली आहे. ती थेट पर्यावरणात विसर्जित केली तरी कोणताही धोका नाही. संशोधकांनी या बॅटरीसाठी ‘कोव्हॅलेंट ऑरगॅनिक पॉलिमर’ (उजझी) चा वापर केला आहे. नायट्रोजन आणि कार्बन यांसारख्या कठीण सेंद्रिय रेणूंपासून हे पॉलिमर बनवले जातात. नवा प्रयोग : सहसा सेंद्रिय पॉलिमर पाण्याच्या संपर्कात आल्यावर लवकर खराब होतात. मात्र, संशोधकांनी ‘हेक्साकेटोन-टेट्रामिनोडायबेन्झो-पी-डायॉक्सिन’ नावाचे विशेष संयुग शोधले आहे.

मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना : याची रचना मधाच्या पोळ्यासारखी सपाट आणि मजबूत असते, ज्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आयन बॅटरीच्या ‘अ‍ॅनोड’मध्ये प्रभावीपणे काम करू शकतात. तटस्थ इलेक्ट्रोलाईट : यात पीएच 7.0 (झक 7.0) असलेले तटस्थ इलेक्ट्रोलाईट वापरले आहे, जे पॉलिमरला गंजू न देता आयनची हालचाल वेगाने करते. पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत वॉटर बॅटरी अधिक स्वस्त आणि अज्वलनशील असतात. चीनच्या या नव्या संशोधनामुळे भविष्यात ऊर्जा साठवणूक अधिक सुरक्षित, स्वस्त आणि शतकानुशतके टिकणारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news