

बीजिंग : तुम्ही आतापर्यंत इलेक्ट्रिक कार, बस आणि हलक्या ट्रक्सबद्दल ऐकले असेल. मात्र, चीनच्या ‘जिजिन लाँगकिंग’ या कंपनीने खाणकामासाठी अत्यंत शक्तिशाली असा ‘ZL230E’ हा इलेक्ट्रिक मायनिंग ट्रक सादर केला आहे (यापूर्वी याला LK350E नावाने ओळखले जात होते).
बांधकाम साईटस् आणि मोठ्या खदाणींमध्ये काम करण्यासाठी बनवण्यात आलेला हा ट्रक ‘ऑटोनॉमस’ (Autonomus) आहे, म्हणजेच तो चालकाशिवाय स्वयंचलित पद्धतीने धावू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या ‘EACON’ या ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने याची निर्मिती करण्यात आली आहे. खाणींमध्ये चालणाऱ्या पारंपरिक डिझेल ट्रक्समुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे रोखण्यासाठी ‘जिजिन मायनिंग’ने आपल्या ताफ्यातील इलेक्ट्रिक ट्रक्सची संख्या २०२० मधील १३ वरून २०२५ पर्यंत १,७१९ वर पोहोचवली आहे.
पुढील ३ वर्षांत आपल्या खाणींमधून डिझेल ट्रक्स पूर्णपणे हटवून १०० टक्के इलेक्ट्रिक ट्रक्स वापरण्याचे कंपनीचे ध्येय आहे. याशिवाय खाणींना वीज पुरवण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करण्याची योजना आखली जात आहे. चीनव्यतिरिक्त जगातील इतर मोठ्या मायनिंग कंपन्याही इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर करत आहेत. बीएचपी आणि रिओ टिंटो या कंपन्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियातील पिलबारा येथील झिम्बलबार खदाणीत ‘कॅट ७९३ एक्सई’ (Cat 793 XE) बॅटरी-इलेक्ट्रिक ट्रक्सची चाचणी घेण्यासाठी ‘कॅटरपिलर’ कंपनीसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय रिओ टिंटो मंगोलियातील ‘ओयू तोलगोई’ तांब्याच्या खदाणीत बॅटरी-स्वॅप तंत्रज्ञानावर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रक्सची यशस्वी चाचणी घेत आहे.
वजन आणि क्षमता :
या ट्रकचे एकूण वजन ३५० टन असून, तो एकाच वेळी तब्बल २३० टन वजन सहज वाहून नेऊ शकतो.
दमदार मोटर :
यात ८०० किलोवॉटच्या दोन शक्तिशाली मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. यामुळे तीव्र उतार आणि डोंगराळ-खरबरीत रस्त्यांवरही वेग न गमावता हा ट्रक सहज चढू शकतो.
१,४०० kWh बॅटरी :
या ट्रकमध्ये १,४०० kWh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा ट्रक सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे याची मोठी बॅटरी अवघ्या २५ मिनिटांत ९० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यामुळे कामाचा खोळंबा न होता खणींमध्ये अखंडितपणे काम सुरू ठेवणे शक्य होते.
चालकरहित ट्रक
EACON कंपनीची क्लाऊड-बेस्ड प्रणाली, विविध सेन्सर्स आणि ‘एआय’ निर्णय-क्षमतेच्या मदतीने हा ट्रक मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने चालवला जाऊ शकतो. अपघातांचा धोका टाळण्यासाठी यात ॲडव्हान्स ब्रेकिंग आणि स्टीअरिंग सिस्टीम देण्यात आली आहे.