China Insect Wine | चीनमध्ये मातीतून काढतात कीटक, तव्यावर भाजून बनवतात ‘वाईन’

China Insect Wine |
China Insect Wine | चीनमध्ये मातीतून काढतात कीटक, तव्यावर भाजून बनवतात ‘वाईन’
Published on
Updated on

बीजिंग : चिन्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अवघ्या जगालाच थक्क करीत असतात. त्यांच्या मेन्यूमध्ये झुरळ, उंदीर, बेडूक यांच्यापासून सापापर्यंत काहीही असू शकते. सध्या चीनमधील एक अशीच परंपरा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे, जी पाहून अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. तिथे माती बाजूला करून तेथील विशिष्ट छोटे किडे गोळा केले जातात व त्यांच्यापासून खास वाईन (मद्य) बनवली जाते.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही लोक नळीने फुंकर मारून माती बाजूला करीत लहान लहान कीटक काढताना दिसत आहेत. यानंतर, याच कीटकांपासून एक विशेष प्रकारची वाईन तयार केली जाते. पहिल्या नजरेत ही पद्धत अत्यंत अजब आणि विचित्र वाटू शकते; परंतु चीनच्या काही भागांमध्ये याला अनेक वर्षांची जुनी पारंपरिक पद्धत मानले जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर या ड्रिंकबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वाईनच्या निर्मितीची सुरुवात शेतातून आणि जंगलातून होते. स्थानिक लोक अशा ठिकाणची माती खोदतात, जिथे विशेष प्रकारच्या अळ्या आढळतात. हे कीटक खराब होऊ नयेत म्हणून त्यांना अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढले जाते.

अनेकदा लोक पातळ स्ट्रॉ किंवा छोट्या अवजारांच्या मदतीने या कीटकांना त्यांच्या बिळांमधून बाहेर काढतात. यानंतर त्यांना स्वच्छ करून पुढील प्रक्रियेसाठी तयार केले जाते. स्थानिक लोकांच्या मते, सर्वच प्रकारचे कीटक यासाठी वापरले जात नाहीत, तर एका विशिष्ट प्रजातीचे कीटकच या पारंपरिक ड्रिंकसाठी खास मानले जातात. मातीतून कीटक काढल्यानंतर ते आधी स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते उन्हात चांगले वाळवले जातात, जेणेकरून त्यामधील ओलावा पूर्णपणे निघून जाईल. वाळल्यानंतर त्यांची बारीक पावडर तयार केली जाते. यानंतर ही पावडर तांदळापासून बनवलेल्या दारूमध्ये किंवा इतर अल्कोहोलिक बेसमध्ये मिसळली जाते. काही ठिकाणी यामध्ये गरम पाण्याचाही वापर केला जातो. अनेक पारंपरिक पद्धतींमध्ये, हे कीटक दारूत टाकण्यापूर्वी तव्यावर हलके भाजून घेतले जातात. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ लागतो आणि हे बनवण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या कुटुंबांमध्ये चालत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news