China Robot Soldiers | पाच ते दहा वर्षांत युद्धभूमीत उतरणार चीनचे ‘रोबो सैनिक’

‘टर्मिनेटर’सारखे जग आता दूर नाही!
China Robot Soldiers |
China Robot Soldiers | पाच ते दहा वर्षांत युद्धभूमीत उतरणार चीनचे ‘रोबो सैनिक’
Published on
Updated on

बीजिंग : आज चीन एकापेक्षा एक प्रगत ह्युमनॉईड रोबोंची निर्मिती करत आहे. आपल्या याच क्षमतेचे जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी चीनची राजधानी बीजिंगमध्ये ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबो गेम्स- २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रोबो अगदी माणसांप्रमाणे वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. मात्र, रोबोंची ही शर्यत केवळ खेळाच्या मैदानापुरती मर्यादित ठेवण्याचा चीनचा उद्देश नाही. ज्या तंत्रज्ञानाची आज धावणे, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये चाचणी घेतली जात आहे, त्याचा लष्करी वापरासाठी कसा उपयोग करता येईल, यावरही चर्चा रंगू लागली आहे. या आयोजनानंतर चीन लवकरच रोबो सैनिकांना युद्धभूमीत उतरवू शकतो, अशा बातम्या समोर येत आहेत.

शांघायस्थित ‘एजी बीओटी’ या ह्युमनॉइड रोबो कंपनीचे रोबोटिक्स इंजिनिअर यांग कुन यांनी ‘सीबीएस न्यूज’शी बोलताना सांगितले की, चिनी कंपन्या येत्या ५ ते १० वर्षांत असे ह्युमनॉइड रोबो विकसित करू शकतात, ज्यांचा वापर लष्करी मोहिमांमध्ये केला जाईल. युद्धभूमीत मानवाऐवजी यंत्रांचा वापर करणे ही भविष्याची एक महत्त्वाची दिशा ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. अहवालानुसार, या रोबोंचा वापर एखाद्या देशाची ताकद दाखवण्यासाठी आणि इतर देशांना आक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी (दबाव निर्माण करण्यासाठी) केला जाऊ शकतो. तसेच, यंत्रांच्या वापरामुळे मानवी सैनिकांचा जीव धोक्यात येण्यापासून वाचेल.

चीनमध्ये आयोजित ‘२०२६ वर्ल्ड ह्युमनॉईड रोबो गेम्स’मध्ये १६ देशांतील ६०० हून अधिक संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत २,००० पेक्षा जास्त रोबो विविध खेळांमध्ये आपापली कौशल्ये दाखवत आहेत. या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, लांब उडी, भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग), बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल आणि अडथळ्यांची शर्यत (हर्डल रेस) यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. अनेक रोबोंनी उत्तम कामगिरी केली, तर काही रोबो धावताना खाली पडले, सुरक्षा कठड्यांवर धडकले, तर काहींमध्ये आगीच्या घटनाही समोर आल्या. यादरम्यान एका ह्युमनॉईड रोबोटने १०० मीटरची शर्यत अवघ्या ९.३९ सेकंदांत पूर्ण करून नवा विक्रम रचला. ही वेळ २००९ मध्ये उसैन बोल्टने नोंदवलेल्या ९.५८ सेकंदांच्या विक्रमापेक्षाही वेगवान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news