

बीजिंग : चीनने 15 मार्च रोजी बीजिंग वेळेनुसार रात्री 8.15 वाजता लाँग मार्च-2सी रॉकेटवरून दोन उपग्रह प्रक्षेपित केले. प्रथम व द्वितीय टप्प्यांचे प्रक्षेपण यशस्वी झाले; मात्र वरच्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत पोहोचू शकले नाहीत. या बिघाडामुळे चीनच्या स्पेस युटिलायझेशन तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्रासाठी (CSU) हा मोठा धक्का होता.
अपयशानंतर उपग्रह पृथ्वीच्या अपेक्षित कक्षेपेक्षा खूपच जवळ होते आणि त्यांना नियंत्रणाबाहेर फिरताना आढळले. याशिवाय, काही नुकसान झाल्यामुळे त्यांना पुरेशी सूर्यप्रकाश ऊर्जा मिळू शकत नव्हती, जे कक्षाबदलासाठी आवश्यक होते. या गंभीर परिस्थितीतून उपग्रहांना वाचवण्यासाठी CSU च्या अभियंत्यांनी 123 दिवस अथक प्रयत्न केले. CGTN या चिनी वृत्तसंस्थेनुसार, अखेर ग्रॅव्हिटेशनल स्लिंगशॉट या तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेत पुन्हा पोहोचवण्यात आले. यासाठी अभियंत्यांनी पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून उपग्रहांना योग्य मार्गदर्शन दिले, हे एक अत्यंत अवघड व अत्याधुनिक अवकाशीय गणिती कौशल्य असलेले यश मानले जात आहे.
CSU संशोधक झांग हाओ म्हणतात, ‘तो माझा पाहिलेला पहिला प्रक्षेपण प्रयोग होता. सुरुवातीला गडबडीची कल्पनाच नव्हती. जर उपग्रह नष्ट झाले असते, तर वर्षानुवर्षे घालवलेले कष्ट व गुंतवलेले पैसे वाया गेले असते. मानसिकद़ृष्ट्याही आमच्या टीमवर मोठा आघात झाला असता; पण सुदैवाने तसे झाले नाही.’ त्यांच्या टीमने दोन गटांमध्ये काम केले, एक टीम उपग्रहांचे फिरणे थांबवण्यासाठी थ-स्टर्स वापरत होती, तर झांग यांच्या टीमने उपग्रहांना योग्य मार्गावर परत आणण्यासाठी कक्षीय मार्गांची गणना केली. हे उपग्रह DRO- A आणि DRO- B, यापूर्वी लाँच झालेल्या ऊठज- ङ उपग्रहासह आता एकत्र झाले आहेत.
हे तिन्ही मिळून एक अशी अवकाशीय ‘कॉन्स्टेलेशन’ तयार करतात, जी भविष्यातील अंतराळयानांसाठी नेव्हिगेशन सेवा पुरवेल. CSU चे संशोधक माओ झिन्युआन यांनी सांगितले की, या उपग्रहांच्या मदतीने एखाद्या अंतराळयानाचे स्थान केवळ तीन तासांत ठरवता येईल - सध्या जमिनीवरील तंत्रज्ञानाने त्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. हे तंत्रज्ञान अवकाशयानांचे स्वयंचलित संचालन शक्य करून देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या ‘उपग्रह बचाव मोहिमे’मुळे केवळ लाखो डॉलर्सचे नुकसान टळले नाही, तर अंतराळ प्रवासासाठी नवीन दारे उघडली गेली आहेत. ग्रॅव्हिटेशनल स्लिंगशॉटचा वापर करून बिगडलेली कक्षा सुधारणे ही एक मोठी वैज्ञानिक कामगिरी मानली जात असून, ही युक्ती भविष्यात दीर्घ अंतराच्या अवकाश मोहिमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.