

बीजिंग : 2020 साली चीनच्या ‘चांगी 5’ (Chang' e 5) अंतराळ मोहिमेने चंद्रावरून पृथ्वीवर आणलेले सुमारे 1,731 ग्रॅम (3.8 पौंड) वजनाचे माती व खडकांचे नमुने अखेर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत; पण अमेरिकेतील शास्त्रज्ञांना हे नमुने मिळवणे आणि त्यावर संशोधन करणे फारच कठीण ठरत आहे. त्यामागे एका खास कायद्याचे कारण आहे.
मे 2025 च्या सुरुवातीस, ब्रिटनमधील ओपन युनिव्हर्सिटीचे ग्रहशास्त्रज्ञ डॉ. महेश आनंद यांनी चीनला जाऊन ‘चांगी 5’ मोहिमेच्या नमुन्यांपैकी 60 मिलिग्रॅम (0.002 औंस) एवढा छोटा भाग संशोधनासाठी ‘उधार’ घेतला. याशिवाय युरोप, इथिओपिया, रशिया आणि अमेरिका येथील काही शास्त्रज्ञांनाही नमुने मिळाले आहेत; मात्र अमेरिकेतील परिस्थिती वेगळी आहे.
अमेरिकेतील स्टोनी ब्रूक विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ टिमोथी ग्लॉच हे ‘चांगी 5’ नमुना मिळवणारे एकमेव अमेरिकन शास्त्रज्ञ ठरले आहेत; मात्र ‘नासा’ त्यांना निधी पुरवू शकत नाही, कारण 2011 साली लागू झालेल्या ‘वुल्फ अॅमेंडमेंट’ नावाच्या कायद्यामुळे ‘नासा’ आणि चीनच्या अंतराळ संस्था ‘सीएनएसए’ यांच्यातील थेट सहकार्यावर बंदी आहे. रिपब्लिकन सिनेटर फ्रँक वुल्फ यांच्या पुढाकाराने हा कायदा 2011 च्या संघीय बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.
या कायद्याचा उद्देश अमेरिकेच्या अंतराळ तंत्रज्ञानाचा लष्करी वापर चीनकडून होऊ नये, यासाठी ‘नासा’ आणि चिनी संस्थांमध्ये थेट वैज्ञानिक देवाणघेवाण रोखणे हा आहे. परिणामी, ‘नासा’ ज्या वैज्ञानिकांना निधी पुरवते, त्यांनाही चीनच्या वैज्ञानिकांसोबत सहकार्य करण्यास मज्जाव आहे. विशेष म्हणजे शीतयुद्धाच्या काळातही, अमेरिका आणि रशिया यांनी विज्ञानाच्या माध्यमातून सहकार्य केले होते, उदाहरणार्थ, 1975 मधील ‘अपोलो-सोयूझ’ संयुक्त अंतराळ मोहीम, जिथे अमेरिकन आणि रशियन अंतराळवीरांनी अंतराळात हातमिळवणी केली होती. पण ‘वुल्फ अॅमेंडमेंट’ हे अशा ऐतिहासिक सहकार्याच्या परंपरेला छेद देणारे पाऊल मानले जाते.