

बीजिंग : हजारो वर्षांपासून, सध्याच्या नैऋत्य चीनमध्ये राहणार्या एका वांशिक गटाने त्यांच्या मृतांना कड्यांच्या बाजूला ‘हँगिंग कॉफिन’ (टांगलेल्या शवपेट्या) मध्ये ठेवले होते. मात्र, त्यांची ओळख अनेक वर्षांपासून संशोधकांसाठी गूढ राहिली होती. आता एका नवीन जनुकीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ही प्राचीन अंत्यसंस्काराची परंपरा आजूबाजूच्या प्रदेशात आजही राहणार्या लोकांच्या पूर्वजांनी केली होती.
संशोधकांना असेही आढळले की, ‘टांगलेल्या शवपेट्या’ (ज्यामध्ये लाकडी शवपेट्या उघड्या कड्यांवर खिळल्या जात असत) ही परंपरा पाळणारे प्राचीन लोक आणि चीनच्या दक्षिणेकडील व आग्नेय आशियाच्या किनार्यांवर राहणारे निओलिथिक (नवपाषाण युगातील) लोक यांच्यात जनुकीय संबंध आहेत. ‘या अंत्यसंस्काराच्या प्रथेच्या जनुकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांबद्दल मौल्यवान माहिती मिळते,’ असे संशोधकांनी त्यांच्या अभ्यासामध्ये लिहिले आहे. हा अभ्यास ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
गेल्या 30 वर्षांमध्ये संशोधकांनी चीन आणि आग्नेय आशियामध्ये शेकडो हँगिंग कॉफिनचे दस्तऐवजीकरण केले आहे. ऐतिहासिक नोंदी आणि मौखिक परंपरांमधून असे दिसून येते की, ‘बो’ म्हणून ओळखल्या जाणार्या एका लहान वांशिक गटाने ही प्रथा सुरू केली होती. परंतु, या नवीन अभ्यासासाठी संशोधकांनी हे रहस्य कायमस्वरुपी सोडवण्यासाठी जनुकीय विज्ञानाची मदत घेतली. संशोधकांनी त्यांच्या तपासणीत चीनमधील चार ‘हँगिंग कॉफिन’ स्थळांवर असलेल्या 11 व्यक्तींच्या जनुकीय माहितीचे विश्लेषण केले, त्यापैकी काही लोक 2,000 वर्षांपूर्वी राहत होते.
याव्यतिरिक्त, त्यांनी वायव्य थायलंडमधील एका गुहेत सापडलेल्या प्राचीन ‘लॉग कॉफिन’ (मोठ्या लाकडी खोडाच्या पेट्या) मध्ये असलेल्या चार व्यक्तींच्या अवशेषांची तपासणी केली, ज्यापैकी सर्वात जुने अवशेष 2,300 वर्षांपूर्वीचे आहेत. तसेच त्यांनी ‘बो’ वंशाच्या सध्या जिवंत असलेल्या 30 लोकांच्या जनुकीय नमुन्यांचादेखील अभ्यास केला. या निष्कर्षांवरून असे सूचित होते की, ‘हँगिंग कॉफिन’वाले लोक आणि त्यामुळे आधुनिक ‘बो’ लोक हे सुमारे 4,000 ते 4,500 वर्षांपूर्वी निओलिथिक काळात (इ.स.पूर्व 10,000 ते इ.स.पूर्व 2,000 पर्यंत) या प्रदेशात राहणार्या गटांशी जनुकीयद़ृष्ट्या जोडलेले होते.