China Bicycle Graveyard | चीनमध्ये सायकलींचे ‘कब्रस्तान’!

China Bicycle Graveyard |
China Bicycle Graveyard | चीनमध्ये सायकलींचे ‘कब्रस्तान’!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : पर्यावरणाचे रक्षण, वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांना स्वस्त प्रवासाची सुविधा देण्यासाठी चीनमध्ये सुरू झालेली बाईक-शेअरिंग व्यवस्था काही वर्षांतच मोठ्या समस्येत बदलली. चीनमधील अनेक शहरांच्या बाहेर आज लाखो वापरात नसलेल्या सायकलींचे डोंगर उभे राहिले असून, या ठिकाणांना सायकलींची ‘कब्रस्ताने’ असे म्हटले जात आहे.

डॉकलेस बाईक-शेअरिंगच्या सुविधेमुळे नागरिकांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून जवळची सायकल अनलॉक करून वापरता येत होती. प्रवास पूर्ण झाल्यानंतर ती सायकल ठरावीक ठिकाणी परत करण्याची गरज नव्हती. त्यामुळे सुरुवातीला ही सुविधा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली; मात्र या व्यवसायातील नफ्याची शक्यता पाहून चीनमध्ये ७० हून अधिक खासगी कंपन्या उतरल्या. कंपन्यांनी शहरांमध्ये तब्बल १.६ कोटींपेक्षा अधिक सायकली रस्त्यावर आणल्या.

काही काळात वापरकर्त्यांची संख्या १३ कोटींहून अधिक झाली; मात्र सायकलींचा पुरवठा आणि प्रत्यक्ष मागणी यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली. रस्ते, फुटपाथवर सायकलींचे ढीगअनेक शहरांमध्ये फुटपाथ, रस्ते, पार्किंगची ठिकाणे आणि मेट्रो स्थानकांच्या परिसरात सायकलींची गर्दी झाली. वापर केल्यानंतर सायकली कुठेही सोडून दिल्याने त्या एकमेकांत अडकून पडू लागल्या. काही कंपन्या आर्थिक अडचणीत सापडून बंद झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. कंपन्यांचे अ‍ॅप आणि वेबसाइट बंद झाल्याने मोठ्या संख्येने सायकली अक्षरशः बेवारस झाल्या. शहराबाहेर सायकलींचे ‘डोंगर’ शेवटी स्थानिक प्रशासनाने रस्त्यांवरील बेवारस सायकली जप्त करून शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली.

तब्बल ३० ते ४० फूट उंच सायकलींचे ढीग

दक्षिण-पूर्व चीनमधील शियामेनसारख्या शहरांच्या परिसरात सायकलींचे ढीग तब्बल ३० ते ४० फूट उंच झाले. रंगीबेरंगी सायकलींचे हे ढीग वरून पाहिल्यास एखाद्या कलाकृतीसारखे दिसत असले, तरी त्यामागे अनियंत्रित व्यावसायिक स्पर्धा आणि नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र समोर आले.२०१८च्या तुलनेत आता या सायकलींचे ढीग हळूहळू कमी केले जात आहेत. प्रशासनाकडून नियम अधिक कडक करण्याबरोबरच वापरात नसलेल्या सायकली हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news