China Bullet Train | चीनमध्ये ताशी ३५० कि.मी. वेगाने धावणारी नवीन बुलेट ट्रेन सुरू

दुर्गम डोंगराळ भागातून ६ तासांचा प्रवास झाला कमी वेळेचा
China Bullet Train |
China Bullet Train | चीनमध्ये ताशी ३५० कि.मी. वेगाने धावणारी नवीन बुलेट ट्रेन सुरू
Published on
Updated on

बीजिंग : चीनने आपल्या देशातील मध्य आणि पश्चिमेकडील भागांना जोडण्यासाठी ताशी ३५० कि.मी. या वेगाने धावणारी नवीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन सेवा सुरू केली आहे. नवीन 'G3966' बुलेट ट्रेन शिआन ईस्ट रेल्वे स्टेशनवरून नुकतीच रवाना झाली. यासोबतच शिआन-शियान हाय-स्पीड रेल्वे मार्गावरील अधिकृत वाहतूक सुरू झाली आहे. २५७ किलोमीटर लांबीच्या या नवीन हाय-स्पीड रेल्वे लाईनमुळे शिआन (शांक्सी प्रांत) आणि शियान (हुबेई प्रांत) दरम्यानचा प्रवासाचा सहा तासांचा वेळ आता कमी झाला आहे. हा रेल्वे मार्ग आधीपासून कार्यरत असलेल्या वुहान-शियान हाय-स्पीड रेल्वेशीदेखील जोडला गेला आहे. यामुळे आता शिआन ते वुहान हा प्रवास अवघ्या २ तास ४१ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

हा रेल्वे मार्ग ‘किनलिंग’ पर्वतरांगांमधून जातो, ज्या उत्तर आणि दक्षिण चीनमधील नैसर्गिक सीमा मानल्या जातात. यासोबतच ही ट्रेन ‘हानजियांग’ नदीदेखील पार करते, जी यांगत्झी नदीची प्रमुख उपनदी आहे. अत्यंत अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात बऱ्याच काळापासून वाहतूक आणि आर्थिक क्रियाकलाप मर्यादित होते. हेच आव्हान लक्षात घेऊन चीनने २०२१ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले होते. या प्रकल्पावर एकूण ४७.६८ अब्ज युआन (सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर्स) ची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्रकल्पाचे मुख्य डिझायनर माओ लेई यांच्या मते, ही रेल्वे अशा भागातून जाते ज्याला ‘नैसर्गिक भूवैज्ञानिक संग्रहालय’ म्हटले जाते.

दुर्गम आणि डोंगराळ भागामुळे संपूर्ण रेल्वे लाईनचा ९० टक्क्यांहून अधिक भाग केवळ पूल आणि बोगद्यांवर तयार करण्यात आला आहे. या नवीन सेवेसोबत सुरू झालेले ‘शिआन ईस्ट रेल्वे स्टेशन’ हे उत्तर-पश्चिम चीनमधील एक मोठे वाहतूक केंद्र बनले आहे. १ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या या स्टेशनचे बांधकाम ५G, ‘बायडू’ (BeiDou) नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमवर आधारित हाय-प्रिसिजन पोझिशनिंग आणि इंटेलिजेंट कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आले आहे. स्टेशनच्या छतावर ३०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. यातून दरवर्षी सुमारे ७० लाख kwh हरित वीज निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या विजेचा वापर स्टेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news