

बीजिंग : चीनमधील पारंपरिक गरम पाण्याच्या झर्याला आता एक अनोखे वळण मिळाले आहे. पारंपरिक चिनी औषध प्रणालीने प्रेरित झालेले ‘हॉटपॉट बाथ’ लोकांना गरम सूपसारख्या पाण्यात स्नान करण्याची संधी देत आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या बाथ हाऊसमध्ये दूध, मिरची, गोजी बेरी आणि लाल खजूर यांसारखे आरोग्यवर्धक मानले जाणारे पदार्थ टाकले जातात.
ऑक्टोबर महिन्यात हेईलोंगजियांग प्रांतातील हरबिन शहरातील एका रिसॉर्टने या ट्रेंडचे सर्वात आकर्षक रूप सादर केले. तिथे पाच मीटर रुंदीचा गोलाकार गरम पाण्याचा झरा लाल आणि पांढरा अशा दोन भागांमध्ये विभागलेला आहे. लाल भाग हा तिखट सूपसारखा दिसतो, ज्यामध्ये मिरची, कोबी आणि वांगी टाकली आहेत. स्टाफनुसार, हा लाल रंग गुलाबाच्या पाकळ्यांमधून येतो, ज्या दररोज बदलल्या जातात.
पांढरा भाग हा दूध, लाल खजूर आणि गोजी बेरीने बनलेला सौम्य सूप दर्शवतो. स्टाफच्या म्हणण्यानुसार, गरम पाण्यात टाकलेल्या हलक्या मिरच्या चयापचय वाढवतात आणि रक्तप्रवाह सुधारतात, तर दूध त्वचेला आर्द्रता प्रदान करते. म्हणजे, हा अनुभव चव, सुगंध आणि आरोग्य या तिन्हीचे मिश्रण आहे. रिपोर्टनुसार, या आकर्षणाचे प्रवेश तिकीट सुमारे 160 युआन (जवळपास 1,900 रुपये) आहे. यात हॉटपॉट बाथ, सॉना आणि बुफे जेवणाचा समावेश आहे.
येथे वय किंवा वेळेची कोणतीही कठोर मर्यादा नाही; परंतु 15-20 मिनिटांपर्यंत आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. हे बाथ पारंपरिक औषधी वनस्पती आणि आधुनिक वेलनेसच्या अनोख्या संगमाचे प्रतीक आहेत. शतकानुशतके जुन्या औषधी स्नानामुळे प्रेरित झालेला हा ट्रेंड आता एक द़ृश्य आणि सांस्कृतिक अनुभव बनला आहे. आरोग्यासाठी असो वा सेल्फीसाठी, चीनमधील हे सूप बाथ सोशल मीडियावर सगळ्यांना आकर्षित करत आहे.