नवी दिल्ली : एक काळ असा होता ज्यावेळी चिकुनगुनियाचे मोजकेच रुग्ण आढळत होते. मात्र, आता या आजाराने संपूूर्ण जगभर आपले हाय-पाय पसरले आहेत. भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजेच 'आयसीएमआर'ने आता देशातील चिकुनगुनियाच्या संक्रमणाशी संबंधित एक सर्व्हे रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. तो 'द लान्सेट' या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकातही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या मदतीने चिकुनगुनियाला कारणीभूत होणार्या विषाणूशी लढण्यासाठी तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी भविष्यात लस विकसित करण्याच्या कार्यात मदत मिळू शकेल.
या पाहणीसाठी तीन वयोगट तयार करण्यात आले होते. त्यामध्ये 5 ते 8, 9 ते 17 आणि 18 ते 45. भारतातील उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम अशा पाच भौगोलिक क्षेत्रांमधील लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. या सर्व्हेत असे दिसून आले की पूर्व आणि ईशान्य क्षेत्रांच्या तुलनेत दक्षिण, पश्चिम आणि उत्तर क्षेत्रात चिकुनगुनियाचा फैलाव अधिक आहे. मात्र, भविष्यात पूर्व आणि ईशान्य भारतातही त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या सर्वेक्षणाचा व निष्कर्षांचा उपयोग भविष्यात लसीच्या चाचण्या आणि त्यासाठी उपयुक्त वयोगट तसेच भौगोलिक ठिकाणे यासाठी होऊ शकतो.
सध्या चिकुनगुनियावर कोणतेही विशिष्ट रामबाण औषध उपलब्ध नाही. त्याच्यावर सीरोलॉजिकल परीक्षण उपलब्ध असून ते मलेशियाच्या मलाया विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. या आजारापासून बचाव करण्याचा उपाय म्हणजे त्याचा फैलाव करणार्या डासांपासून स्वतःचा बचाव करणे. चिकुनगुनियाचा विषाणू माणसाच्या शरीरात एडिस डासाच्या दंशामुळे संक्रमित होतो. त्याची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. अचानक तीव्र ताप येणे, सांधेदुखी, स्नायूदुखी, मळमळणे, थकवा आणि त्वचेवर लालसर चट्टे ही त्याची लक्षणे आहेत. कधी कधी डेंग्यूच्या लक्षणांशी चिकुनगुनियाची गल्लतही केली जाते.