

वॉशिंग्टन : बहुतेक कोंबड्यांचा शेवट मानेवर पडणार्या एका घावाने होतो. मात्र, कोंबडीचे डोके धडावेगळे केल्यानंतरही ती धावू शकते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकतो. यामध्ये ‘मिरॅकल माईक’ नावाच्या कोंबडीची गोष्ट प्रसिद्ध आहे, जी डोके कापल्यानंतरही 18 महिने जिवंत राहिली होती. परंतु, विज्ञान याबद्दल काय सांगते? कोंबड्या खरोखरच डोक्याशिवाय जिवंत राहू शकतात का?
याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कोंबड्या डोक्याशिवाय फार काळ जगू शकत नाहीत. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या पशुवैद्यकीय विभागातील डॉ. मार्सी लॉग्सडन यांच्या मते, ‘डोके कापल्यानंतर कोंबड्यांचे पंख फडफडणे किंवा पाय हलवणे ही सामान्य बाब आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे धावणे फार दुर्मीळ आहे. हे केवळ स्नायूंच्या तीव्र आकुंचनांमुळे घडते आणि ही हालचाल साधारणपणे एक मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळ टिकते.’ कोंबडी जिवंत आहे की मृत, हे मृत्यूच्या व्याख्येवर अवलंबून असते.
डोके कापल्यानंतर प्रथम ‘ब्रेन डेथ’ (मेंदूचा मृत्यू) होतो आणि त्यानंतर काही सेकंदांनी ‘कार्डियाक डेथ’ (हृदयाचा मृत्यू) होतो. ब्रेन डेथ : मेंदूची संपूर्ण कार्यक्षमता थांबणे आणि स्वतःहून श्वास घेण्यास असमर्थ असणे म्हणजे ब्रेन डेथ. ‘अॅनिमल्स’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या 2019 च्या अभ्यासानुसार, मानेला झटका दिल्यानंतर 30 सेकंदांच्या आत कोंबडीच्या मेंदूतील विद्युत क्रिया थांबते. अवशिष्ट क्रिया : अल्बर्टा येथील युनिव्हर्सिटी ऑफ लेथबि—जचे न्यूरोसायंटिस्ट अँर्ड्यू इवानियुक म्हणतात, ‘त्या काही सेकंदांत कोंबडीला सभोवतालच्या गोष्टींची शुद्ध असते, असे नाही, तर ती केवळ मेंदूतील उरलेली विद्युत क्रिया असते.’
थोडक्यात सांगायचे, तर डोके धडावेगळे झाल्यानंतर कोंबडीमध्ये दिसणारी हालचाल ही केवळ मज्जासंस्थेतील शेवटच्या लहरींमुळे असते. वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून ती केवळ काही सेकंद तांत्रिकद़ृष्ट्या ‘जिवंत’ असू शकते, परंतु ती शुद्धीत नसते. 18 महिने जिवंत राहिलेल्या कोंबडीसारख्या घटना या अत्यंत दुर्मीळ अपवाद असून, त्यात मेंदूचा काही भाग शरीराला जोडलेला राहिल्यामुळे ते शक्य झाले असावे, असे मानले जाते.