

न्यूयॉर्क : सौदी अरेबियाच्या उत्तर भागात असलेल्या गुहांमध्ये शास्त्रज्ञांना चित्त्यांचे ममीकरण झालेले अवशेष सापडले आहेत. या शोधामुळे या भागात एकेकाळी वावरणार्या चित्त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लुप्त झालेल्या या प्राण्याच्या प्रजातीवर नवा प्रकाश पडणार आहे.
सौदी अरेबियातील अरार शहराजवळील गुहांमधून शास्त्रज्ञांनी 7 ममी आणि इतर 54 चित्त्यांची हाडे उत्खनन करून बाहेर काढली आहेत. हे अवशेष 130 वर्षांपासून ते 1800 वर्षांहून अधिक जुने आहेत. या चित्त्यांचे शरीर नैसर्गिकरित्या जतन झाले आहे. गुहेतील कोरडे हवामान आणि स्थिर तापमानामुळे हे अवशेष खराब न होता टिकून राहिले असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे. या ममींचे डोळे ढगाळ झाले असून त्यांचे पाय आकुंचन पावले आहेत; मात्र त्यांचे शरीर पूर्णपणे शाबूत आहे. या मोठ्या सस्तन प्राण्यांचे अशा प्रकारे नैसर्गिकरित्या जतन होणे अत्यंत दुर्मीळ आहे.
अनेकदा मृत प्राण्यांना इतर शिकारी प्राणी खाऊन टाकतात, मात्र या गुहांमध्ये ते सुरक्षित राहिले. शास्त्रज्ञांनी या ममींच्या जनुकांचा अभ्यास केला असता असे आढळले की, हे चित्ते आजच्या काळातील आशियाई आणि उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील चित्त्यांशी मिळतेजुळते आहेत. ही माहिती भविष्यात ज्या ठिकाणी आता चित्ते उरलेले नाहीत, तिथे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. एकेकाळी चित्ते संपूर्ण आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात आढळायचे. मात्र, शिकारी आणि त्यांचा नैसर्गिक रहिवासाच्या जागा नष्ट झाल्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून अरबी द्वीपकल्पातून चित्ते पूर्णपणे नामशेष झाले आहेत.